नागपूर येथून यवतमाळकडे येणाऱ्या भरधाव वेगातील चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला.
ही घटना गुरुवारी (दि.१) सकाळी ८.३० च्या सुमारास भारी येथील विमानतळाजवळ घडली.
महागाव तालुक्यातील इजनी येथील बाबाराव रावते हे त्यांचे व्याही दत्तात्रय डाखोरे (रा.गोकुल, ता. माहूर) यांची चारचाकी वाहन घेऊन नागपूरला नातवाला सोडण्यास गेले होते.
नागपूर येथून गुरुवारी सकाळी ते परत निघाले असता भारी गावाजवळ त्यांच्या भरधाव गाडीचा टायर फुटून अपघात झाला.
यात बाबाराव रावते यांचा मृत्यू झाला. तर दत्तात्रय डाखोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
विलास राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक सचिन खोब्रागडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





