पंढरपूर दि: २९ जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला.
कर्मयोगी विद्यानिकेतन ही एक संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा म्हणून पंढरपूर पंचक्रोशीमध्ये नावारूपास आली आहे. सण वार, रीती रिवाज, रूढी परंपरा ह्यांची सांगड निसर्गाशी घालत, जपत तंत्रज्ञानाकडे झेपावणाऱ्या ह्या नवीन पिढीला आपल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच उंच भरारी मारायची आहे, असे कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई म्हणाल्या. आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील पहिला सण असणाऱ्या नागपंचमीला शाळेच्या विद्यार्थ्यांना नागपंचमीच्या सणाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रशालेमध्ये सर्प अभ्यासक श्री. बालाजी बडवे आणि इतर सर्पमित्र यांना आमंत्रित करून शिक्षक व विद्यार्थ्यांना नागाविषयी व विविध सापांविषयी असणारे समज व गैर समज आणि अंधश्रद्धा यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले,”हा सण पर्यावरणाचा आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये पंचमीची गाणी, झिम्मा, फुगडी, फेर धरले. असे विविध पारंपारिक खेळ खेळून मनसोक्त आनंद घेतला.
नागपंचमीच्या या उत्साही वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सणाचे महत्त्व आणि निसर्गाबद्दल आदरभाव निर्माण झाला. कार्यक्रमात सर्व शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.
ह्या वेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूरचे चीफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक आणि संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेशजी वाळके, इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली काशिद आणि सचिव माधुरी जोशीही उपस्थित होत्या.