Pandharpur Live News Onlin : सोलापूर शहरात सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत दोघे एकमेकांसमोर आले. त्यातील उत्तम प्रकाश सरवदे (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) याला २०१९ मध्ये भावाचा खून झालेले आठवले.
या गुन्ह्यात एक वर्ष तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आलेल्या तुकाराम ऊर्फ रॉबट पांडुरंग सरवदे यानेच तो खून केल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी उत्तम सरवदे याने तुकारामला धरून जोरात जमिनीवर आपटले. त्याच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन तुकाराम सरवदे याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी संशयिताला एका तासातच शोधले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी ठोठावली आहे.
संशयित आरोपी उत्तम सरवदे आणि मयत तुकाराम सरवदे हे एकाच गल्लीत (जोशी गल्ली) राहायला आहेत. त्या दोघांच्या घराकडे ये-जा करण्याचा रस्ता एकच आहे. तत्पूर्वी, २०१९ मध्ये किरकोळ कारणातून संशयित आरोपी उत्तमच्या भावाचा खून झाला होता. तो खून तुकाराम सरवदे यानेच केला असा संशय त्याच्या मनात कायमचा राहिला. सहा वर्षे त्यांच्यात केवळ एकमेकांकडे बघण्याशिवाय काहीच भांडण झाले नव्हते.
पण, सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दोघेही दारू पिऊन घराकडे निघाले होते. रात्री उशीर झाल्याने गल्लीतील सगळेजण झोपी गेले होते. उत्तमला समोरून येणारा तुकाराम दिसला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि भावाच्या खुनाच्या रागातून उत्तम सरवदे याने तुकारामला उचलून रस्त्यावर आपटले.
त्यानंतर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यातच तुकाराम सरवदे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस त्याठिकाणी पोचले. पोलिसांनी जखमीला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी खून करून अंधारात लपून बसलेल्या मारेकऱ्याला अवघ्या एका तासातच शोधून काढले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, पण पोलिसांना त्याठिकाणी कोणतेही हत्यार सापडले नाही. धष्टपुष्ट असलेल्या उत्तमने तब्येतीने किरकोळ असलेल्या तुकाराम ऊर्फ रॉबटला उचलून जमिनीवर आदळून मारल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस निरीक्षक शबनम शेख तपास करीत आहेत.