सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (solapur krushi utpanna bazar samiti) ची एका महिन्यात निवडणूक घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) दिले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच लागणार आहे.
बाजार समितीची निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्या स्थितीत स्थगित करण्यात आली होती. तसेच नव्याने प्रारूप मतदारयादी तयार करण्याच्या सूचना सहकार, पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या होत्या. त्या निर्णयाच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक तसेच सुरेश हसापुरे यांचे समर्थक बसवराज माळगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा निकाल बुधवारी लागला आहे.
आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. दिलीप माने, बळीराम साठे, सुरेश हसापुरे, बसवराज बगले यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची असेल. त्या नेत्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांची हकालपट्टी केली आहे. त्यांच्या ठिकाणी सोलापूर शहर सहकारी उपनिबंधक प्रगती बागल यांची प्रशासक म्हणून नेमणूक केल्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योगाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी दिले आहेत.