अकोल्यातील प्रसन्न वानखडे या बारावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वर्गमित्रासह संबंधित पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचामुळे प्रसन्नने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
अकोला शहरातील आकाशवाणी केंद्रामागील जलाराम सोसायटीमध्ये ही घटना घडली. बुलढाण्यातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. मागील महिन्यात या विद्यार्थ्याचा आणि अन्य एका विद्यार्थ्याचा वाद झाला होता. या वादानंतर प्रसन्नविरोधात सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, या प्रकरणातून सुटका करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यानं विद्यार्थ्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलिसांवर एक लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रसन्नच्या आत्महत्येस कुणी जबाबदार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले आहे.