लातूर: तालुक्यातील महादेववाडी येथे शेतीच्या वादातून मुलाने आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वनिता प्रकाश चामे (वय ५५) असे मृत आईचे नाव असून विक्रम प्रकाश चामे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
वनिता प्रकाश चामे (वय ५५) यांचा मुलगा विक्रम प्रकाश चामे याने गेल्या काही दिवसांपासून शेती माझ्या नावावर करून दे म्हणून आईकडे तगादा लावला होता. परंतु, आई आपल्या मुलाच्या नावावर जमीन करून देण्यास नकार देत होती.
संशयित आरोपी विक्रम चामे याने याचा राग धरून आईचा काटा काढण्याचे ठरविले. बुधवारी (ता. २६) मध्यरात्री दीडच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात धारदार कुऱ्हाड घातली. यात आई वनिता चामे मृत पावल्या.
पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने विक्रमने रक्ताने माखलेले घरातील कपडे जाळत मृतदेह घरामागील जनावरांच्या गोठ्यातील पाण्याच्या हौदात फेकून देत घातपात झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी हौदातून मृतदेह काढून पंचनामा केला असता विक्रमवर संशय बळावला
यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यास त्याब्यात घेतले असून मृत आई वनिता चामे यांची मुलगी कैवल्या ज्ञानोबा गंगावारे (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक स्मिता जाधव, बी.पी. साळवे, केशव जायभाये करीत आहेत.