इचलकरंजी: विषारी द्रव्य प्राशन केल्याने विवाहितेचा आज उपचारदरम्यान सांगली सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. राखी संपत शिकलगार (वय-४१ रा.वेताळपेठ परिसर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
दरम्यान पत्नीच्या मृत्यूमुळे असहाय्य आणि निराधार वाटत असलेल्या संपत यांनी कृष्णा नदीच्या अंकली पुलावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवदूतासारखी माणसे धावली आणि त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. याबाबत सांगली पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळ व सांगली सिव्हिल रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, संपत आणि राखी यांचे कुटुंब वेताळपेठ परिसरात राहते. मंगळवारी (ता.25) राखी यांनी काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दोन दिवसापासून पुढील उपचार सांगलीच्या सिव्हील रुग्णालयात सुरू होते.मात्र आज गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान राखी यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवस पत्नीची जिवापाड सेवा करत होते. मात्र पत्नीच्या जाण्याने संपत यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला.
अस्वस्थ बनलेले संपत डोळ्यांत अश्रूंचा बांध घेऊन रुग्णालयातून निघाले. इचलकरंजीकडे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा केली. मात्र, दुःखाने भारावलेल्या मनाने ते कृष्णा नदीच्या अंकली पुलावर पोहोचले आणि तिथेच त्यांनी रिक्षा थांबवली. एका क्षणात निर्णय घेत त्यांनी थेट पुलावरून नदीत उडी घेतली.
त्वरित रिक्षाचालकासह नागरिकांनी सांगलीच्या आयुष्य हेल्पलाईन टिमने तातडीने संपत यांना नदीतून बाहेर काढले. या घटनेत पायाला इजा झाल्याने संपत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि परिसरातील लोक हादरले. राखी आणि संपत यांना दोन मुले आहेत.
आई गेल्यानंतर वडिलांवर संकट आलेले पाहून मुलांची अवस्था पाहण्यासारखी नव्हती.या संपूर्ण घटनेने हृदय हेलावून टाकणारे दृश्य निर्माण झाले. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
पत्नीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या संपत यांनी पोलिसांना आलोच म्हणून सांगत शहराबाहेरचा रस्ता धरला.पुलावर थांबवली आणि थेट नदीत उडी मारली.मात्र, नियतीला कदाचित त्यांना वाचवायचे होते. तिथे उपस्थित रिक्षाचालक आणि नागरिकांनी त्वरित प्रतिक्रिया देत ‘आयुष हेल्पलाईन’ला माहिती दिली.
या टीमचे प्रमुख अमोल पाटील, अविनाश पोवार, चिंतामणी पोवार, रुद्रप्रताप कारंडे, आदिल शेख आणि महादेव यांनी तातडीने धाव घेतली आणि संपत यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पुन्हा सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.