नागपूर: आईला शिवीगाळ केल्याने झालेल्या वादात मुलाने काठीने वार करून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊतपुर बाजार चौक येथे घडली.
बाबाराव मधुकर जयपुरकर (वय ५२) असे मृतकाचे नाव आहे. तर अंशुल उर्फ गौरव बाबाराव जयपूरकर (वय १९) असे मुलाचे नाव आहे.
अंशूल एका गॅरेजमध्ये काम करतो. बाबुराव यांना दारूचे व्यसन होते. बुधवारी सकाळी ११ वाजता बाबुराव दारू पिऊन घरी आले. पत्नीला शिवीगाळ करायला लागले. अंशुलने शिवीगाळ करण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात अंशुलने काठीने बाबुराव यांच्या डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ते खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोंढाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे उत्तरीय तपासणीस पाठवला. पोलिसांनी अंशूल याला अटक केली आहे.