पुणे: पुण्यातील कर्वेनगर भागात काही दिवसांपूर्वी एक मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. साखळी चोराने पादचारी महिलेचं मंगळसूत्र हिसकावल्यानंतर मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा घेण्यासाठी पुन्हा आला होता.
याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. साखळी चोराने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून हा गुन्हा केला होता. या साखळीचोराला आता अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.
दागिने हिसकावणारा चोरटा मध्य प्रदेशातील इराणी टोळीतील असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी १५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हमीद अफसर खान असं आरोपीचं नाव असून तो लोणी काळभोरच्या पठारे वस्तीत राहायला होता. तो मूळचा मध्यप्रदेशातील होशिंगाबाद येथील रहिवासी आहे. याबाबत एका ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तक्रारदार महिला २२ जानेवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत इतर एक वयोवृद्ध महिला होता. दरम्यान रस्त्यावरून चालत असताना दुचाकीस्वार चोरटा हमीद खानने त्यांना गाठलं. त्याने तक्रारदार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. ते चोरताना मंगळसूत्राचा अर्धवट भाग तुटला. त्यानंतर खान दुचाकीरून काही अंतर गेला. मंगळसूत्राचा अर्धवट राहिलेला भाग हिसकावण्यासाठी तो पुन्हा तेथे आला. त्याने ज्येष्ठ महिलेला धक्का दिला आणि अर्धवट तुटलेला भाग हिसकावून पळ काढला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
याच फुटेच्या आधारे पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी जवळपास १०० ते १५० ठिकाणांचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात पसार झालेला चोरटा हमीद खान असल्याचे निष्पन्न झाले. खान याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. खान याने महिलांकडील दागिने चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली.


