टेभूर्णी: सशस्त्र सीमा बल मधील जवानाच्या मुलाने अज्ञात कारणावरुन घरातील वडीलांच्या रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. माढा तालुक्यातील आढेगांव येथे सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्या पूर्वी ही घटना घडली असून श्रीधर गणेश नष्टे ( वय -14 रा.
आढेगांव ता.माढा ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
याविषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहाती अशी, आढेगांव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंस्टेस्टर म्हणून नोकरीस आहे. आढेगांव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे, पत्नी सारिका,श्रीधर व श्रेयश ही दोन मुले राहतात.
गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडे असते. आज दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वी घरातील दुसर्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडीलांच्या रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.
श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे समजू शकले नाही. या घटनेची खबर धनाजी हिराजी जवळगे (वय -40 रा. आढेगांव ता.माढा जि. सोलापूर ) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे, सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे आदींनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे करीत आहेत.


