नाशिक: शेताच्या बांधावर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिंधुताई मारुती वाजे ( वय-५६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
ही घटना सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील वारुंगसे नामक शेतकरी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेताच्या बांधावर गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला.
त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत याची माहिती मुलगा धनंजय याला दिली. त्याने शेतावर येऊन पाहिले असता मृतदेह गावातील सिंधुताई वाजे यांचा असल्याचे समजले. याबाबत माहिती धनंजयने नागरिकांना दिली. सिन्नर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच निफाड येथील पोलिस उपअधीक्षक डॉ. पालवे यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली. अधिक तपासासाठी श्वान पथकाला आणण्यात आले होते, तसेच ठसे तज्ज्ञांनी परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरात मृत व्यक्तीच्या चपला आढळून आल्या तसेच मृतदेहाच्या कपड्यांमध्ये कुलपाची चावी सापडली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
सिंधुताई वाजे गेल्या काही वर्षांपासून डुबेरे येथे माहेरीच राहात होत्या. त्यांना मूलबाळ नाही. सिन्नर येथे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात काम करून उदरनिर्वाह करत होत्या. त्या रविवारी (दि.१९) सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कामावरून घरी आल्या. त्यानंतर ७ च्या सुमारास घराकडून दुचाकीवर बसून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे. त्याआधारे तपासी अधिकारी मारेकऱ्याची ओळख पटवून शोध घेत आहेत.


