दिघंची (ता. आटपाडी) येथील रानमळा ते नळमळा डांबरी रस्त्यावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. पार्वती दत्तू जाधव (वय 80, रा. नंदेश्वर भोसे, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर, सध्या रा. नळमळा, दिघंची) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता घडली.
याबाबत त्यांचे नातू नितीन यशवंत मोरे (रा. दिघंची) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित ट्रॅक्टर चालक समाधान दादासोा पवार (रा. नळमळा, दिघंची) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पार्वती जाधव या रानमळा ते नळमळा या डांबरी रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. यावेळी समाधान पवार हा विना नंबरचा ट्रॅक्टर, तसेच विना नंबरच्या दोन ट्रॉल्या घेऊन निघाला होता. या ट्रॅक्टरने पार्वती जाधव यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


