सोलापुरात रिक्षातून दररोज शाळेला जाणाऱ्या मुलीची चालकासोबत चांगली ओळख झाली. त्याने विश्वास संपादित करून मैत्रीचा हात पुढे केला. पुढे ते एकमेकांसोबत बोलू लागले.
पण, एकेदिवशी त्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांतच ११ जणांनी आळीपाळीने सतत अत्याचार केले. अल्पवयीन पीडितेच्या आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनीही कोर्टात अचूक युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी गुन्ह्यातील आठ आरोपींना जन्मठेप तर, तिघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
ऑगस्ट २०१९ मध्ये रिक्षातून शाळेत जाणाऱ्या पीडितेची ओळख चालक सचिन श्रीकांत राठोड याच्यासोबत झाली. काही दिवसांतच ओळखीतून मैत्री आणि पुढे प्रेमात रूपांतर झाले. मुलीचा विश्वास बसल्याची खात्री करून सचिनने लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. तिला रंगभवन चौकात सोडले, त्यावेळी राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई याने तिला रिक्षात बसवून नेऊन अत्याचार केला. त्याच दिवशी सायंकाळी प्रवीण श्रीकांत राठोड यानेही शहराबाहेर नेऊन अत्याचार केले. काही दिवसांनी प्रवीणचा मित्र आनंद ऊर्फ राजवीर राठोड यानेही अत्याचार केले. त्यानंतर गणेश ऊर्फ अक्षय विष्णू चव्हाण व सतीश अशोक जाधव या दोघांनी पीडितेला रिक्षातून शहराजवळील जंगलात नेऊन आळीपाळीने अत्याचार केले.
काही दिवसांनी प्रवीणने पीडितेला तिच्या महाविद्यालयाकडे रिक्षातून नेले. त्याठिकाणी थांबलेल्या अक्षय व रोहित श्याम राठोड या दोघांनीही त्यांच्या कारमध्येच अत्याचार केले. एकेदिवशी पीडिता कॉलेजमधून घरी जात असताना रोहित राठोड व टिकटॉक किंग दिनेश परशू राठोड आणि चेतन राम राठोड यांनीही कारमध्ये सामुहिक अत्याचार केले. गौरव विलास भोसले यानेही लग्नाच्या अमिषातून अत्याचार केला. न्यायालयात या गुन्ह्याची सुनावणी सुरु असताना उपस्थितांच्याही अंगावर शहारे उभारले होते.
‘ती’ आत्महत्येच्या प्रयत्नात होती, तेव्हाच…
तब्बल ११ जणांच्या सततच्या जबरदस्तीच्या अत्याचाराला त्रासून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या त्या पीडितेचे रडणे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर पडले आणि त्यांनी तिला धीर दिला. त्या सामाजिक कार्यकर्त्याने पीडितेला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी यांनी स्वत: गुन्ह्याचा तपास केला आणि आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले. त्यातून आरोपींना कठोर शिक्षा लागली.
आरोपींना शिक्षा अन् पीडितेला मिळाला न्याय
या गुन्ह्यात पीडितेने स्वत:हून फिर्याद दिली नव्हती, एका सामाजिक कार्यकर्त्याने वाचा फोडली. पोलिस चौकशीनंतर गुन्हा उघड झाला. त्या सामाजिक कार्यकर्त्याने वाचा फोडली. पोलिस चौकशीनंतर गुन्हा उघड झाला. त्या सामाजिक कार्यकर्त्याने ही बाब समोर आणली नसती तर कदाचित गुन्हा समोर आला नसता. पीडितेच्या आर्थिक परिस्थितीचा आरोपींनी गैरफायदा घेतला होता. गुन्ह्याच्या सुनावणीवेळी ३८ साक्षीदार तपासले, घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय अहवाल, असे सर्व पुरावे आरोपींविरुद्ध होते. आमचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली व पीडितेला न्याय मिळाला.
– प्रदीपसिंह राजपूत, जिल्हा सरकारी वकील, जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर


