सोलापूर दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आलेल्या गावातील कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिल्या. या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करावी. तो निधी प्रत्येक जिल्ह्यास दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियानाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात पुणे विभागीय आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस पालकमंत्री विजय देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. शिंदे यांनी प्रथम सन 2015-16 आणि 2016-17 या कालावधीत झालेल्या अभियानातील कामाचा जिल्हावार आढावा घेतला. सन 2016-17 मध्ये निवडलेल्या 825 गावांपैकी 677 गावातील 80 टक्क्यापेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. ही सर्व कामे जून पर्यंत पूर्ण करावीत त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या विविध प्रकाराच्या कामांमुळे अनेक गावातील टँकरची संख्या कमी झाली आहे. काही गावातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. हे सारे श्रेय जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामाला आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात बदल झाले आहेत, असे श्री. राम शिंदे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानातून अनेक गावात अतिशय चांगली कामे झाली आहेत. त्या कामांवर आधारित चांगल्या यशकथा, व्हिडीओ, डॉक्युमेंटरी केल्या जाव्यात. केलेल्या कामांचे सादरीकरण चांगल्या पध्दतीने केले जावे, अशा सूचनाही प्रा. शिंदे यांनी केल्या.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात पाणी साठवण स्त्रोतांच्या सुधारणा आणि दुरुस्ती करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर घेतली जावीत. 1972 च्या दुष्काळी कालावधीत उभारण्यात आलेले विविध पाझर तलाव आणि बंधारे यांच्या दुरुस्तीवर लक्ष द्यावे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे पावसाळ्यानंतर त्रयस्थ संस्थेकडून परिक्षण करुन घ्यावे.
प्रारंभी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुणे विभागात सन 2015-16, 16-17 मधील झालेल्या कामांची आणि सन 2017-18 मध्ये करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. जलयुक्त शिवार मधील कामे गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार होतील याकडे कटाक्ष असून 2016-17 ची कामे मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत अधिक्षक कृषी अधिकारी विनय आवटे यांनी पुणे विभागाचे सादरीकरण तर पुणे विभागातील जिल्ह्यांचे जलयुक्त शिवार कामांचे सादरीकरण संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांनी केले.
बैठकीस सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार गणपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, अनिल बाबर, नारायण पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सांगली जिल्हाधिकारी विजयकुमार काळम – पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, कुणाल खेमणार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, कृषी विभागाचे विभागीय कृषी सह संचालक महावीर जंगटे, श्री. विजयकुमार इंगळे यांच्यासह पुणे विभागातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूरचे जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी आभार मानले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




