पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017
सोलापूर दि.30 :- पारंपारिक शेती पध्दतीने शेतीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर कमी क्षेत्रात करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने सुरू केलेल्या समूह शेती योजनेचा लाभ घेऊन समूह शेती करण्यास पुढे यावे असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयामार्फत सादेपूर येथे आयोजित महाराजस्व आभियानाचे उद्घाटन सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी शेतकरी , ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना श्री.देशमुख बोलत होते. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार अमोल कदम, उपविभागीय कृषि अधिकारी उमेश बिराजदार यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘शेती आणि शेतकरी महत्वाचा घटक असून शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत सुमारे 182 योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने या पैंकी एकाद – दुसऱ्या योजनेचा लाभ घेतल्यास जीवनात परिवर्तन घडून त्याला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल. शेतीसाठी पाणी महत्वाचे असल्याने पाण्याची बचत करून शेतीला संरक्षित पाणी देणे आज महत्वाचे बनले आहे. यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.”
योग्य बी – बियाणांची निवड, आवश्यक खते, माती परीक्षण करून शेतीला संरक्षित पाणी दिल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळेल असा विश्वास व्यक्त करून सहकारमंत्री देशमुख म्हणाले, पावसाचे वाहून जाणारे पाणी तलावात शेततळ्यात अडविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे.
दक्षिण सोलापूर तालुका राज्यात विकास कामात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी तालुक्याचे असणारे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी एक अतिरिक्त तहसिल कार्यालयास मान्यता मिळाली असल्याचे ते म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुक्यात औद्योगिक विकास साधन्यासाठी उद्योग विकासाच्या योजना राबविण्यावर भर राहणार आहे. येथील शेतकरी तरूणाला रोजगार उपलब्ध होण्या बरोबर रोजगार देणारा उद्योजक तरूण तालुक्यात निर्माण झाला पाहिजे असे ते म्हणाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 10 हजार शेतकरी खातेदारांच्या खात्यावर सुमारे 61 कोटी रूपयांच्या कर्जाची रक्कम जमा झाली आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील 900 खातेदारांच्या खात्यावर 6 कोटी 50 लाख रूपयांच्या कर्जाची रक्कमेचा समावेश आहे. महाराजस्व अभियानात महसूल, कृषि, पशुसंवर्धन, महावितरण याबरोबर अन्य विभागांनी लावलेल्या स्टॉलवर प्रत्येक शेतकऱ्यांनी भेट देवून शासन योजनांचा लाभ घेण्याची माहिती अवगत करून घ्यावी. कार्यक्रमात मंत्री महोदयांच्या हस्ते मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड, जातीचा दाखला, ट्रॅक्टर चे वितरण करण्यात आले.
तहसिलदार अमोल कदम यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात महाराजस्व अभियाना बाबत माहिती दिली. यावेळी महसूल, कृषि, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तत्पुर्वी सहकारमंत्री देशमुख यांनी निंबर्गी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावात नवीन व्यवसाय सुरू होण्यासाठी तसेच बाजार ओट्यासाठी प्रस्ताव पाठवावा अशा सूचना संबंधितांना दिल्या. 14 व्या वित्त आयोगाचा निधी, त्यातून घेण्यात येणारी कामे यांचे नियोजन करावे. यामध्ये जनतेचा सहभाग घ्यावा असे ते म्हणाले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




