पंढरपूर Live 3 December 2017
निलेश चाळक बीड : येथील गजबजलेल्या बसस्थानकात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. अशोक केदार (रा. सांगवी ता. केज, हमु बार्शी नाका, बीड) असे त्या जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अशोक केदार हा ३५ वर्षीय तरुण खासगी वाहन चालक आहे. बसस्थानकातील फलाट क्र. ६ च्या बाजूला तो प्रवाशी शोधत होता. यावेळी वाहनचालक संतोष राधाकिसन खापे (रा. सावता माळी चौक, बीड) हा तेथे आला. दोघांमध्ये थट्टामस्करी झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि संतोषने स्वत:कडील धारदार शस्त्राने अशोक केदारच्या छातीवर वार केला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत अशोक ओरडत पोलीस चौकीत आला. पोहेकॉ जालिंदर बन्सोडे यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यास तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलविलं. त्यानंतर संतोष खापे यास ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं अशोक केदार बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी कुठलेही शस्त्र आढळून आले नसून संतोष खापे याने ब्लेडने वार केल्याचा दावा केला आहे, तर जखमी अशोक केदारने आपल्यावर चाकूने हल्ला झाल्याचे सुरुवातीलाच पोलिसांना सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुुरु होती.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





