👁 7 Views

जबाबदारीचे भान राखा अन्यथा गय नाही; एसपी जी श्रीधर यांचा इशारा

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018

निलेश चाळक बीड : मी आज बीडला आहे, उद्या बदली होऊन इतरत्र जाईल; परंतु हे शहर तुमचे आहे. येथे तुम्हाला रहायचे आहे. त्यामुळे जबाबदारीचे भान ओळखा अन् कायदा – सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा. कायदा हातात घ्याल तर कोणाचीही गय करणार नाही असा निर्वाणीचा इशारा अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला.
भीमा कोरेगावातील तणावाचे २ जानेवारी रोजी जिल्ह्यात पडसाद उमटले होते. यानुषंगाने पोलीस मुख्यालयावर शनिवारी सायंकाळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. विनायक मेटे, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधीक्षक श्रीधर म्हणाले, बंद  अथवा आंदोलनादरम्यान शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला पाहिजे. आंदोलनादम्यान सोशल मीडियावरील पोस्ट व छायाचित्रावरुन आपला संयम ढळू देऊ नका. आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये १८ ते २२ या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याचे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. आपली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने भरकटत आहे याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगून त्यांनी उपस्थितांना आंतर्मुख केले. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे. त्याच्या हातून गुन्हा घडणार नाही व त्यामुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. पोलिसांवर नाहक आरोप करण्याऐवजी आधी नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखा. कायदा  राबविण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असून पोलिसांना आव्हान देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला. यापुढे आंदोलन, रॅली व अन्य कार्यक्रमांच्या आयोजनास परवानगी देताना आयोजकांकडून कायदा- सुव्यवस्था अबाधित राहील असे लेखी घेतले जाईल. त्यानंतरच परवानगी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. विनायक मेटे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्याला सामाजिक सौहार्दतेची परंपरा आहे. बंधुभाव टिकून रहावा यासाठी एकोपा व सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्नच उद्भवणार नाही यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावरुन व्हायरल होणारे आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे यास चाप लावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, रमेश चव्हाण, अशोक हिंगे, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सुभाष लोणके, भगवान कांडेकर, प्रशांत वासनिक, फारुक पटेल, अजिंक्य चांदणे, अनिल डोंगरे, राजू जोगदंड, स्वप्निल गलधर, महेश धांडे, बी. बी. जाधव, अ‍ॅड. मंगेश पोकळे, राहुल दुबाले यांनी विविध सूचना मांडून कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली. उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी केले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.  यावेळी दर्पण दिनानिमित्त माध्यम प्रतिनिधींचा भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
परस्परविरोधी विधाने करणाऱ्याना तंबी
शांतता समिती बैठकीत काही पदाधिकाऱ्यानी परस्परविरोधी वक्तव्ये केली. शांतता समितीच्या बैठकीतच विसंवाद होऊ लागल्याने स्वत: अधीक्षक जी. श्रीधर यांनी माईकचा ताबा घेत संबंधित कार्यकर्त्यांना ‘ही शांतता समितीची बैठक आहे, इथे एकमेकांची उणीदुणी काढायची नाहीत’ अशा शब्दांत भानावर आणले. यावेळी त्यांनी ‘व्यवस्थित संवाद करायचा नसेल तर बाहेर जा… कायदा कसा राबवायचा ते माहीत आहे’ असे सांगून कारवाईची तंबी दिली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणा रोबोटप्रमाणे आहे… असा उल्लेख केला तर काहींनी उपअधीक्षकांच्याच गाडीची काच फुटली. त्यात काय कारवाई झाली? असा सवाल उपस्थित केला. त्याचा खुलासा करताना अधीक्षकांनी यंत्रणा सक्षम असल्याचे सांगून उपअधीक्षकांच्या गाडीची काच फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद असून पाच जण ताब्यात असल्याचे सांगितले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *