👁 10 Views

महावितरण कंपनी विरोधात शेतकर्‍यांचा आक्रोश

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018

पंढरपूर-सातारा रस्त्यावर उपरी येथे रास्ता रोको; 
थकीत वीज बिलांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी
। पंढरपूर, प्रतिनिधी
महावितरण वीज कंपनीने पंढरपूर तालुक्यात थकीत असलेल्या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडीत करून रोहित्र सोडविण्याचे काम सुरू केले आहे. उपरी (ता.पंढरपूर) व परिसरातील 10 ते 12 रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविले असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पंढरपूर सातारा रस्त्यावर उपरी येथे रास्ता रोको आंदोलन केले.
जोपर्यंत खंडीत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यामुळे पंढरपूर-सातारा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुष्काळातील वीज बिले माफ करावीत, थकीत वीज बिले भरण्यासाठी चार ते पाच महिन्याची मुदत वाढ मिळावी, रखडलेल्या सिंगल फेज योजना सुरू करून गाव डिपीचा प्रश्‍न कायम स्वरूपी सोडवावा आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. कंपनीच्या वतीने थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडीत करून रोहित्र सोडविण्याचे काम सुरू असल्याने जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल हात आहे. नवीन लागवडीचे पिके ऐन हिवाळ्यात धोक्यात आली आहेत. कोणताही अधिकार नसताना कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दंडेलशाही पद्धतीने रोहित्र सोडविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. 
यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांकडून केवळ वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन दिले जात होते. परंतू जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.त्यामुळे वरिष्ठांशी संपर्क साधून महावितरणच्या अधिकार्‍यांनी दोन दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन दिले. आत्महत्येचे लोन आता पश्‍चिम महाराष्ट्रात आले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आमच्या जीवाशी खेळू नका, आमच्यावर दादागिरी करू नका, अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी दिला. 
याप्रसंगी सहकार शिरोमणीचे संचालक विलास जगदाळे, माजी उपसरपंच शहाजी मोहिते, शहाजी जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित शेतकर्‍यांच्या वतीने भंडीशेगांव शाखा अभियंता सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सेवा सोसायटीचे मा. चेअरमन बाळासाहेब नागणे, उपसरपंच आण्णा नागणे, पै. साहेबराव नागणे, दत्तात्रय मा. नागणे, तंटामुक्त समितीचे अध्यी नवनाथ आसबे, मा.अध्यक्ष तुकाराम नागणे, साहेबराव नागणे, चंद्रकांत बागल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला भीक नको कष्टाचा दाम द्याआम्ही नेमके कशा कशा करिता रस्त्यावर उतरायचे हे कळेनासे झाले आहे. वीज बिलांबाबत लोकप्रतिनिधींना फोन लावला तर ते म्हणतात बिले भरा. ‘अच्छे दिन’ येतील म्हणून बदल केलेल्यांनीच सर्व पैसा काढून घेतला आहे. गोड बोले बाहुले गोड बोलून शेतकर्‍यांसह सर्वांनाच वेठीस धरत आहेत. आम्हाला भीक नको कष्टाचा दाम हवा आहे. आम्हाला लाईट द्या, दुष्काळाचे वीज बिल माफ करा अन्यथा आम्हाला ट्रकभर कासरे द्या, आम्ही हुतात्मे होण्यास तयार आहोत.
– दत्तात्रय तु. नागणे, शेतकरी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *