शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे -सहकार मंत्री चंद्रकांत पाटील

                                                                  
पंढरपूर दि. 06:- 
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शासनामार्फत शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी शासन राबवित असलेले जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन सहकार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पाचे, 130 टनी बॉयलरचे अग्निप्रदीपन सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री भारत भालके, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, नारायण पाटील उपस्थित होते.
सहकार मंत्री म्हणाले, राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असली तरी या परिस्थितीवर मात करुन शेतकऱ्यांना मदत करण्याचेच धोरण शासनाचे आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे  येत्या पाच वर्षात राज्यात दुष्काळी परिस्थती राहणार नाही.  मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले काम झाले आहे. सोलापूर जिल्ह्यानेही जलयुक्त शिवार अभियानात उल्लेखनीय काम केले आहे.
सहकारमंत्री म्हणाले,  अडचणीत असलेली राज्यातील साखर कारखानदारी टिकावी यासाठी साखर कारखान्यांना साखर निर्यातीसाठी शासनामार्फत मदत करण्यात आली आहे. उस उत्पादक शेतकऱ्यांना 21 हजार कोटीची एफआरपी मिळवूनही दिली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. राज्यात रस्ते विकासाची सुरु असलेली कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे  नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या कामासाठी केंद्राकडून भरीव मदत प्राप्त झाली असून राज्य शासनही आपल्या निधीतून रस्ते विकासाची कामे प्राधान्याने करत आहे. पुढील काही वर्षात संपूर्ण ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झालेला दिसून येईल असे सहकार मंत्री यांनी यावेळी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचा विकास आत्मियतेने सुरु केला असल्याबद्दल सहकार मंत्री पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार भारत भालके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दुष्काळी भागाला पाणी मिळावे, या परिसरातील रस्त्यांची कामे व्हावीत अशी मागणी मंत्रीमहोदयांकडे त्यांनी केली.
भीमा कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांनी  कारखान्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती  प्रास्ताविकात दिली.
समारंभास नानासाहेब महाडिक, कल्याणराव काळे, बी. ए. रुपनर, काकासाहेब देशमुख, सी. पी. बागल,  प्रा. शिवाजी सावंत, कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद ई.जी., व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह परिसरातील अन्य मान्यवर पदाधिकारी,  कारखान्याचे संचालक आणि सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *