👁 11 Views

शाश्वत पाणी साठ्याचा मूलमंत्र जलयुक्त शिवार अभियान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  सोलापूर दि. 24 :-  जलयुक्त शिवार अभियान आता लोकचळवळ बनली आहे. हे अभियान लोकांसाठी शाश्वत पाणी साठ्याचा मूलमंत्र बनले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंद्रुप येथे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.

            जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सीतामाई तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, जिल्हयाचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी  डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भरुड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

      मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानानंतर आता राज्य शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे धरणातील गाळ काढल्याने धरणाच्या  पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.  धरणातील पाणी साठा वाढल्याने परिसरातील सिंचन क्षेत्रात वृध्दी होऊन याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यावर जमिनीची सुपिकता व पोत वाढण्यास मदतच होणार आहे. पर्यायाने त्याचा शेतीच्या उत्पादनावर सकारात्मक परिणाम होणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

            जलयुक्त  शिवार अभियानांतर्गत मंद्रुप येथील सीतामाई पाझर तलावाच्या खोलीकरणाचे काम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून होणार आहे.  या पाझर तालावाची पाणी साठवण क्षमता 4.93 द. ल. घ. फूट इतकी असून तलावाच्या खोलीकरणानंतर पाणी साठवण क्षमतेत  4.45 द. ल. घ. फूटाने वाढ होणार आहे. त्यामुळे तलावाची एकूण पाणी साठवण क्षमता 9.38 द. ल. घ. फूट इतकी होईल. तलावाच्या खोलीकरणानंतर  सिंचन क्षेत्रात 22 हेक्टरने वाढ होऊन  तलावामुळे 46 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *