बट हा काश्मीरमधील ए ++ दर्जाचा दहशतवादी
- गेल्या वर्षी जुलैत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा चमकीत मारला गेला. त्यानंतर सबझार अहमद बट याने या संघटनेच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेतली. त्याचे नाव ‘सब डॉन’ असेही होते. आज तो त्राल येथे चकमकीत मारला गेला. त्याच्या संघटनेच्या समूहाने टाकलेल्या व्हिडिओ व छायाचित्रात तो अनेक ठिकाणी दिसला होता.
- बट हा काश्मीरमधील ए ++ दर्जाचा दहशतवादी होता व त्रालमध्ये लोकप्रिय होता. त्याने प्रमुखपद घेतल्याची घोषणा हिज्बुलने कधीच केली नव्हती. काहींच्या मते सबझार हा लगेच प्रमुख झाला नव्हता, तर पंधरा दिवसांपूर्वी झाकीर रशीद म्हणजे झाकीर मुसाने पद सोडल्यानंतर तो प्रमुख बनला होता.
- बट हा दक्षिण काश्मीरमधील त्रालचा रहिवासी होता. बुरहान वानी याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जात असे. दोन वर्षे वानी याच्याबरोबर त्याने काम केले होते. हिज्बुलच्या अनेकांशी त्याचा संपर्क होता.
- बट याचे एका मुलीवर प्रेम होते, पण तिच्या कुटुंबाने त्याला नाकारले तेव्हा नाते तुटल्याने तो दहशतवादाकडे वळला.
- तो बालपणापासून बुरहान वानी याचा मित्र होता व बुरहान वानीचा भाऊ खालीद मारला गेला तेव्हा बटने लष्करी जवानाकडून रायफल हिसकावली होती. तेव्हापासून तो हिज्बुलमध्ये नावारूपास आला.
- बट याने एक छायाचित्र टाकले होते त्यात तो बुरहान वानी व इतर अकरा जणांसमवेत दिसत होता.
- हिज्बुलच्या दहशतवादी मोहिमात सबझार आघाडीवर होता व झाकिर मुसा याने त्याची तांत्रिक विभागाचा प्रमुख म्हणून नेमणूक केली होती.
- बट याच्या नावाने १० लाखांचे इनाम होते, त्याचे दहशतवादी प्रशिक्षण भारतातच झाले होते.
- बट हा त्राल येथे मार्च २०१७ मध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात सापडला होता, पण रात्रीच्या अंधारात पळून गेला.
- पंच, सरपंच, सुरक्षा दले यांच्यावर तो हल्ला करीत असे. सबझार याने अनेक नागरिकांना मारले होते, जे लष्कराचे खबरे होते.
- काश्मीरच्या विभाजनवादी चळवळीच्या उद्देशावरून झाकीर मुसा याने हुर्रियतच्या नेत्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती; तेव्हा त्यांच्यात समझोता घडवण्यासाठी सबझार बट हा १९ व २० मे रोजी श्रीनगरला आला होता.
काश्मीर खोऱ्यात ५० हजार जवान तैनात

हिज्बूल मुजाहिदीनचा अतिरेकी सबजार अहमद बटला सुरक्षा दलाने ठार केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा भडकली असून काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर दगडफेक सुरू आहे. त्यातच आज सबजारचे दफन होणार असल्याने आणखी हिंसा भडकण्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसह ५० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सबजारच्या मृत्यूनंतर दहशवाद्यांनी डोकेवर काढू नये म्हणून सुरक्षा दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
सबजारचा आज दफनविधी असल्याने काश्मीर खोऱ्यात तणावाची परिस्थिती असून आजचा दिवस जवानांसाठी कसोटीचा राहणार आहे. काश्मीर खोऱ्याच्या काही भागात दगडफेकीच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलने सुरू असून त्याला हिंसक वळण लागले आहे. त्यातच फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये बंद पुकारला असून आज रमजानचा पहिला दिवस असल्यानेही सुरक्षा दलाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफच्या ५० बटालियन म्हणजे ५० हजार जवान तैनात केले आहेत. १५ जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असल्याने या ठिकाणी आणखी ७ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तणाव वाढल्यास देशाच्या दुसऱ्या भागातूनही सुरक्षा दलाला या ठिकाणी पाचारण केले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलंय. तर काश्मीर खोऱ्यात पुरेस सुरक्षा बळ तैनात असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
सबजारचे जन्मगाव असलेल्या त्रालमध्येही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी सुरक्षा दलाने खास पर्याय शोधले आहेत. बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारात सीआरपीएफने आंदोलकांवर पॅलेट गनचा मारा केला होता. त्यामुळे आंदोलकांच्या चेहरा आणि डोळ्याला मार लागला होता. त्यावरून सीआरपीएफवर टीकाही झाली होती. त्यामुळे आता सर्व पॅलेट गनमध्ये डिफ्लेक्टर्स लावण्यात आले आहेत, अशी माहिती सीआरपीएफचे राजीव राय भटनागर यांनी सांगितलं. डिफ्लेक्टरमुळे आंदोलकांच्या शरीराच्या वरच्या भागावर मार लागत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काल सबजार ठार झाल्यानंतर अनंतनागमध्ये प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी सीआरपीएफचे सहाय्यक कमांडर हरविंदर सिंह यांच्या डोक्याला मार लागला होता.





