नवी दिल्ली
भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार’ संस्कृतीवर तोफ डागत सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुहा यांच्या आरोपांची दखल घेऊन प्रशासकीय समितीनं दबावाची संस्कृती मोडून काढण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याचा पहिला फटका कर्णधार विराट कोहलीला बसणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक निवडताना यापुढं कोहलीला कुठलाही विशेषाधिकार न देण्याचा निर्णय प्रशासकीय समितीनं घेतला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची निवड क्रिकेट सल्लागार समिती करत असते. या समितीवर सध्या सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हे माजी क्रिकेटपटू आहेत. भारतीय संघाच्या पुढील प्रशिक्षकाच्या निवडीचा निर्णय यापुढं फक्त हीच समिती करेल, असं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी स्पष्ट केलं आहे.
कर्णधार विराट कोहलीला संभाव्य प्रशिक्षकाबद्दल मत मांडायचं असल्यास तो सल्लागार समितीपुढं मांडू शकतो. तो आपली इच्छा प्रदर्शित करू शकतो. मात्र, अंतिम निर्णय सल्लागार समितीचाच राहील. विराटला याबाबतीत कोणताही ‘नकाराधिकार’ दिला जाणार नाही. त्याच्याकडं फक्त संघातील खेळाडू निवडण्याचा अधिकार असेल, असंही राय यांनी सांगितल्याचं समजतं
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
.





