👁 10 Views

शेतक-यांचा संप चिघळणार!

शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोहोचले असून आंदोलनकर्त्यां शेतक-यांचा सरकारवरील राग कायम आहे.
मुंबई- आंदोलनकर्त्यां शेतक-यांचा सरकारवरील राग कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी शहरांकडे येणारे दूध आणि भाजीपाला रोखल्याने अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून संपक-यांची धरपकड सुरू आहे. तसेच महागाईचीही टांगती तलवार शहरवासीयांच्या डोक्यावर आहे. शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोहोचले आहे. किरकोळ विक्रेते चढ्या भावाने माल विकत असल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली आहे. संप असाच सुरू राहिल्यास आता भाजीपाला, दूध कसे मिळणार या प्रश्नामुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे.
कोथिंबीरची जुडी १०० रुपयांवर
मुंबईत भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. शुक्रवारी मुंबईतील बाजारात कोथिंबिरीच्या जुडीचा दर १०० रुपयांवर तर मेथीच्या जुडीचे दर ५० रुपयांवर पोहोचला होता. इतर भाज्यांचेही दर वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शेतकरी संप आता चिघळण्याची शक्यता असून किसान क्रांती कोअर कमिटीने ५ जून रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मुंबईवगळता महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली असून बंदच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असे कमिटीच्या पदाधिका-यांनी शुक्रवारी सांगितले. दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतक-यांच्या संपाला पाठिंबा दिला असून शेतक-यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व समृद्धी महामार्गासाठी बळजबरीने जमीन संपादन करण्याच्या विरोधात राज्यातील शेतक-यांनी १ जूनपासून संपाची हाक दिली. सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे हा संप तिस-या दिवशीही सुरूच आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहे. इंदापूरमध्ये शुक्रवारी मिरच्यांचा ट्रक अडवून त्यातील पोती रस्त्यावर ओतून देण्यात आली. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व शहरांत या संपाचा परिणाम जाणवू लागला आहे. नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये दररोज भाजीपाल्याच्या ५०० गाडय़ा येतात. मात्र, या गाडय़ांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. पुण्यातील बाजार समितीत अवघ्या १० टक्के शेतमालाची आवक झाली. कल्याणच्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचा एकही ट्रक आला नसल्याने व्यापारी शिल्लक असलेला माल विकत असून भावही वाढले आहेत. वसई-विरार भागात दुधाची आवक घटली आहे. लातूर भाजी मार्केटमध्ये भाजीची आवक ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.
दूध वितरकांनी घेतला धसका
दूध वितरकांनी शेतक-यांच्या संपाचा धसका घेतला आहे. ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवून त्यातील हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले गेले. त्यामुळे वितरकांनी दुधाच्या गाडय़ा शहरांकडे पाठवणे थांबवल्याचे चित्र आहे. मुंबईत महानंदाचे फक्त १५ हजार २०० लिटर दूध आल्याचे सांगण्यात आले. पुण्यात म्हशीच्या दुधाची ८० रुपये लिटर दराने विक्री होत आहे. दूध घेण्यासाठी दुकानांसमोर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
वाशी मार्केटमध्ये आवक घटली
संपाच्या पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण शुक्रवारी मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडय़ांची आवक घटली. दररोज ५०० ट्रक भरून फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात, पण शुक्रवारी फक्त १८० गाडय़ा आल्या. यात ४९ ट्रक आणि १३१ टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही. दादरमध्ये रोज २०० गाडय़ा भरून भाजीपाला येतो, पण शुक्रवारी फक्त ५५ गाडय़ांमधून भाजीपाला आला. वसई-विरारमध्ये दुधाची आवक ३० टक्के कमी झाली आहे.
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट
पुण्यातील मार्केट यार्डात शुक्रवारी फक्त १० टक्के मालाची आवक झाली. यामुळे भाजीपाल्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्केट यार्डात शुकशुकाट पाहावयास मिळाला. शनिवारी मार्केटयार्ड बंद असल्याने अजून भयाण पारिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारचा निषेध म्हणून शेतकरी रस्त्यावर दुधाचे टँकर ओतून देत आहे. पालेभाज्या रस्त्यावर फेकून दिले जात आहेत. तरी देखील राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत.
पुण्यातील प्रचंड मार्केट यार्डात दररोज १३०० ट्रक घेऊन माल येत असतात. मात्र शुक्रवारी ११० ते १३० मालाचे ट्रक आले. त्याचबरोबर मार्केटयार्डात १० टक्के मालाची आवक झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने फळभाज्या, पालेभाजी आणि कांद्याची आवक झाली असून मिरची, कोबी हा माल पुणे, नगर आणि कर्नाटकमधून आवक करण्यात आला आहे. कमी माल असल्याने दरही दुप्पट झाले आहे. याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या परिस्थितीवर राज्य सरकारने लवकरच मार्ग न काढम्ल्यास कठीण पारिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
औरंगाबाद बाजार समितीत शुकशुकाट
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शुक्रवारी फळभाजीपाला मार्केटला सुट्टी असते. मात्र येथे सुट्टीच्या दिवशी सुद्धा मोठय़ा प्रमाणात भाजीपाला विक्री होत असतो. संप असल्याने बाजार समितीत अतिशय कमी प्रमाणात भाजीपाला आल्याने शुकशुकाट होता. पळशी (ता.औरंगाबाद) येथे शेतक-यांनी आंदोलन करत रस्त्यावर वांगी, कांदे, भाजीपाला फेकून संपात सहभाग घेतला, तर कॅंब्रिज ते सावंगी या रिंग रोडवर सुद्धा शेतक-यांनी आंदोलन करत ठिकठिकाणी गाड्या रोखून धरल्या. पिसादेवी-पोखरी येथील शेतक-यांनी मेथीच्या शेतात शेळ्या सोडून दिल्या. यानंतर मेथीच्या शेतामध्ये ट्रॅक्टर फिरविण्यात आला.
साता-यात तीव्र पडसाद
सातारा जिल्ह्यात शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. सातारा शहरातील बाजार समिती पूर्णत: बंद आहे. ग्रामीण भागातील दूध संकलनाच्या गाडय़ा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात घेत आहेत. आनेवाडी टोल नाका ते जोशी विहीर या मार्गावर पोलीस बंदोबस्तात दुधाचे टॅंकर, भाजीपाल्याच्या गाडय़ा सोडल्या जात आहेत.
परराज्यातील दुधाचे टॅंकर परत पाठवले
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने मुंबई- आग्रा महामार्गावरील सोनगीर (ता. जि. धुळे) टोलनाक्याजवळ आंदोलन केले. त्यावेळी गुजरातहून हैद्राबादकडे जाणारे दूधाचे टॅंकर संघटनेच्या आंदोलनकर्त्यांंनी परतवून लावले. मध्य प्रदेश व गुजरातकडून येणारी भूसार व भाजीपाल्याची चार वाहनेदेखील आंदोलकांनी परत पाठविली. शेतकरी संपामुळे नंदूरबार, शहादा, शिंदखेडा व शिरपूरकडून शेतीमालाचे एकही वाहन धुळ्याकडे आले नाही.
सोलापुरात दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतणे सुरूच
सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संपाचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाप्रमाणेच सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर दूध व भाजीपाला ओतून सरकारचा निषेध केला आहे.
नगरमधील दूध संकलन ठप्प
अहमदनगरला शेतक-यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एका दिवसाचे २० लाख लिटर दूध संकलन सलग दुस-या दिवशी बंद असल्याने पुणे, मुंबई आणि ठाण्याचा दूध पुरवठा ठप्प आहे.
मुंबईला किती दूध आवक होते?
मुंबईला दररोज ६० लाख लिटर दुधाची गरज भासते. इंदापुरातील सोनाई डेअरीकडून मुंबईला दररोज एक लाख लिटर दूध पाठवले जाते. अमूलकडून मुंबईत दररोज ११ लाख लिटर दूध विकले जाते. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे दररोज मुंबईला ७ लाख लिटर, तर वारणा दूध संघाचे अडीच लाख लिटर दूध मुंबईला जाते. नाशिकहून मुंबईला १ लाख ८० हजार लिटर पुरवले जाते.
ठाण्यात फारसा परिणाम नाही
ठाणे जिल्ह्यात दररोज २.५० लाख लिटर दुधाची आवक होते. मात्र शुक्रवारी ही आवक २.१० लाख लिटर झाली. ठाण्यात पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाववरुन काही प्रमाणात दुधाची आवक काही प्रमाणात झाली आहे, तर गुजरातमधूनही अमूल दूधाची मोठय़ा प्रमाणात आवक झाली आहे. दरम्यान संप कायम राहिल्यास दुधाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
आडगावमध्ये ग्रामस्थांनाच वाटले दूध
औरंगाबाद जिल्ह्यातील झाल्टा जवळील आडगाव येथील शेतक-यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी दूध रस्त्यावर फेकून दिले होते. दुस-या दिवशी मात्र शेतक-यांनी दूध फेकू न देता घरोघरी वाटून देण्याचे काम केले. आता आंदोलन सुरु असेपयर्ंत आता दररोज गावातच दूध वाटप केले
बारामतीत वाहू लागले दुधाचे पाट
बारामतीत शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या शेतक-यांनी भाजी मंडई, दुधाचे टेम्पो यांना लक्ष्य केले. आंदोलकांनी मोठय़ा प्रमाणात दूध विक्रीवर नियंत्रण आणले. रस्त्यात पकडलेले दूध ओतून देण्यात आले. यामुळे इंदापूर- बारामती रस्त्यावर दुधाचे पाट दिसत होते. दरम्यान बाजार समितीचे उपबाजार व भाजी मंडईत आज शुकशुकाट होता.
शेतक-यांना वेठीस धरू नका : सहकारमंत्री देशमुख
संपामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतक-यांना वेठीस धरू नका, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकरी संघटनांना केले. देशमुख म्हणाले की, या आंदोलनामुळे लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतले जात आहे. पालेभाज्याही फेकल्या जात आहेत. त्यामुळे शेतक-याचेच मोठे नुकसान होत आहे.
शेतक-यांना हमीभाव मिळायलाच हवा : नाम
महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाला नाम फाउंडेशनने पाठिंबा दिला आहे. शेतक-यांना योग्य हमी भाव मिळायलाच हवा. राज्यात संप होणे ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे. ‘नाम’चा या संपाला पाठिंबाच असून राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे. अन्यथा अराजक माजेल, अशा शब्दात फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनाकपुरे यांनी आपली भूमिका मांडली.
संपाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध
शेतक-यांनी पुकारलेला संप म्हणजे शेतक-यांनी स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेण्यासारखे आहे. असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार हे कारखानदारांचे सरकार होते, तर भाजपचे सरकार हे व्यावसायिकांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी सरकारपेक्षा ग्राहकाच्या विरोधातील आंदोलन करत आहे. त्यामुळे या संपाला आमचा पाठिंबा नाही.
नाशिकमध्ये ४० शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
शेतकरी संघटनांकडून गुरुवारपासून पुकारण्यात आलेल्या संपाचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. नाशिकमध्ये शुक्रवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ४० शेतक-यांना ताब्यात घेण्यात आले आहे. येवल्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर वाहनांचे नुकसान करणा-या सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी एका आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेतक-याच्या मृत्यूस दोषींवर तत्काळ कारवाई करा- विखे पाटील
शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या आंदोलनावर अमानुष लाठीहल्ला करुन अशोक मोरे या शेतक-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
बळीराजाच्या असंतोषाचा कधीही उद्रेक होऊन ते कधीही रस्त्याव उतरू शकतात, असा इशारा विरोधीपक्षाने वारंवार दिला होता. पण शेतक-यांच्या प्रश्नांविषयी संवेदना नसलेल्या या सरकारने शेतक-यांच्या मागण्यांकडे आणि प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक होवून रस्त्यावर उतरला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात सरकारला मोठे अपयश आले आहे. याचा परिणाम शेतक-याचा बळी जाण्यात झाला आहे. कोपरगाव येथील आंदोलनात सहभागी झालेल्या अशोक शंकर मोरे या शेतक-याचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व निषेधार्हअसल्याचे विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे- अशोक चव्हाण
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बेछूट आणि बेजबाबदार आरोप करण्यापेक्षा शेतक-यांचा सरकारवरचा विश्वास का उडाला? त्यांच्यावर संप करण्याची वेळ का आली? याचे आत्मचिंतन करावे. मुख्यमंत्र्यांनी बेछूट आरोप करून विरोधकांपेक्षा शेतक-यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव : शरद पवार
संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांची पूर्तता होत नाही तोपयर्ंत शेतक-यांनी आपली एकी व आंदोलन कायम ठेवावे. अल्पकर्जधारक शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देऊन राज्य सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याला भुलून संपात फूट पडू देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शेतक-यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे. पण शेतकरी बांधवांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असेही ते म्हणाले.
राज्यात उसळलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, शेतक-यांनी संपावर जाण्याचे हत्यार उपसणे ही देशाच्या इतिहासातील अभुतपूर्व पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. राज्यातील या परिस्थितीस केवळ सध्याचे सरकार कारणीभूत आहे. शेतक-यांना संपवण्याचे धोरण सध्याच्या राज्यसरकारचे असल्याने शेतकरी संपावर गेला आहे, असेही ते म्हणाले. निवडणूकीपूर्वी भाजपाने शेतक-यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. पण निवडणुकींनंतर शेतक-यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला.
सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा : राणे
राज्यात सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. हा संप दुर्दैवी असून राज्य सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. शेतक-यांच्या मालाला आधारभूत किंमत द्यावी. स्वामिनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे शेतमालाला दर मिळावा. राज्य सरकारने शेतक-यांच्या संपाबाबत तातडीने लक्ष घालून शेतक-यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात व हा संप तत्काळ मिटवावा. या संपामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपाने फसविले- राज ठाकरे यांचे टीकास्त्र
भारतीय जनता पार्टीने शेतक-यांना फसविले. अनेक आश्वासने दिली. त्यातले एकही पाळले नाही. म्हणूनच आता संपाच्या रूपाने शेतक-यांचा संताप व्यक्त होत आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. जगाला जगविणारा शेतकरी आणि सीमेवर रक्षण करणारा सैनिक यांच्याबद्दल हे सरकार संवेदनशून्य झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने मोठमोठी आश्वासने दिली होती. ती पूर्ण करता येत नसल्याने नुसत्या नवीन योजना जाहीर करून त्यांना नवीन नावे दिली जात आहेत. शेतक-यांनी संप पुकारला मात्र त्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये. अण्णा हजारे मस्थिला येत आहेत, याची आठवण करून दिली असता मध्यस्थिती कुणीही करावी, परंतु शेतक-यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. तसेच सीमेवर सैनिक मरत असताना भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अल्पकर्जधारक शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी हालचाली
शेतक-यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर अल्पकर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने हालचाल सुरू केली आहे. ३१ लाख शेतक-यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, ही योजना तातडीने अमलात येणार नाही. यासाठी राज्य सरकारमधील तज्ज्ञ मंडळी यासंदर्भात अभ्यास करत आहेत. राज्य सरकारच्या या योजनेवर शेतक-यांनी मात्र राग व्यक्त केला आहे. संपूर्ण कर्जमाफी हवी. अल्प कर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी देणे हे सरकारचे फूट पाडण्याचे धोरण आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
अण्णा हजारेंची मध्यस्थी फेटाळली
राज्यातील शेतक-यांच्या बेमुदत संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतक-यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी असल्याचेदेखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. मात्र, पुणतांब्यातील शेतक-यांनी अण्णा हजारेंच्या मध्यस्थीस स्पष्टपणे नकार दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
शेतकरी संपाआड आमच्यावर हिंसा भडकवण्याचे आरोप करणे म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. ठोस पुरावा असेल तर सिद्ध करा, असे जाहीर आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
शेतक-यांनी जर काँग्रेस-राष्ट्रवादीचे ऐकून आंदोलन केले असते, तर जिल्हा परिषद आणि विधानसभेचा निकाल वेगळा लागला असता, असेही चव्हाण म्हणाले. उत्तर प्रदेशातील शेतक-यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातील शेतक-यांना वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी विचारला.
दूध संघात गैरप्रकार झाले आहेत, तर ते सिद्ध करा. फक्त आरोप आणि चौकशा करायच्या आणि चारित्र्यहनन करणे सुरू आहे. ‘महानंद’च्या चेअरमनपदी तुमचीच माणसे आहेत. दोषी असेल त्यांना शिक्षा द्या, जनतेची दिशाभूल करू नका, असेही चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
पुणतांब्यात कोअर कमिटीची स्थापना
शेतकरी संपाने आता अधिक आक्रमक रूप धारण केले आहे. आंदोलनात तोडगा न निघाल्यास सोमवार, दि. ५ जूनला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा शेतकरी कोअर कमिटीने दिला आहे. तसेच ६ जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आणि ७ जूनपासून आमदार-खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही कमिटीने दिलाय. संपाच्या दुस-या दिवशी पुणतांब्यात ग्रामपंचायतीची बैठक पार पडली. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी सकाळी फोन आला होता अशी माहिती कमिटीने दिली. आम्ही चर्चा करायला तयार आहोत असे कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी सांगितले. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.
संपाचा वणवा देशभर पसरेल!
शेतक-यांच्या संपांचा वणवा महाराष्ट्रात पेटला आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या सरकारविरोधातील हा आक्रोश आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांप्रमाणेच संपूर्ण देशातील शेतकरी अडचणीत असल्याने इथे पेटलेला हा वणवा संपूर्ण देशात पसरेल, असा इशारा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिला. सोमवारी राज्यातील सर्व तहसील कार्यालये ताब्यात घेतली जातील, असेही ते म्हणाले. शेतक-यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी येचुरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शेतक-यांबाबतीत इतके असंवेदनशील झालेले सरकार देशातील बडय़ा भांडवलदारांना मोठमोठय़ा सवलती देत आहे. निवडणुकांपूर्वी शेतक-यांना मोठमोठी आश्वासने दिली होती. शेतमालाला हमी भाव देऊन, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव दिला जाईल. शेतक-यांसाठी तिजोरी खाली केली जाईल, अशी आश्वासने दिली होती. मात्र आश्वासने पाळण्याची वेळ आली तेव्हा सरकार पळ काढत आहे. म्हणूनच हा शेतक-यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे, असे येचुरी म्हणाले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *