मोहोळ: सीना नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत अंघोळीसाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने, तसेच पोहता येत नसल्याने नदी पात्रातील पाण्यात बुडून दोन परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बोपले, ता.
मोहोळ येथे बुधवार ता. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शंकर जीवनलाल बिरणवार (वय-19, हट्टा, रा. पाथरी किरणापुर, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) सत्यम मिताराम गईगई (वय-15 हट्टा, रा. पाथरी किरणापुर, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
या संदर्भात मोहोळ पोलीसाकडुन मिळालेली माहिती अशी की, रविवार ता. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शंकर बिरनवार व सत्यम गईगई हे दिवसभर काम संपवुन ते सायंकाळी जवळच असलेल्या सिना नदीत अंघोळीसाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीपत्रात बुडाल्याचे इतरांना दिसून आले.
त्यानंतर त्यांनी ठेकेदार प्रशांत मूलचंद कान्होजी यांना फोन करून सांगितले. 2 फेब्रुवारी रोजी दिवसभर सरकारी दवाखाण्याचे बांधकाम करून सायंकाळी सहा वाजता सुट्टी झाल्यानंतर शंकर बिरनवार, सत्यम गईगई, सुरेश राकेश मेश्राम, रवींद्र अनिल राऊत हे सीना नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही वेळातच सुरज राकेश मेश्राम, रवींद्र अनिल राउत यांनी परत येऊन सांगितले की, आम्ही नदीमध्ये आंघोळ करत असताना शंकर व सत्यम नदीच्या पाण्यात काही अंतरावर गेले असता त्यांना पोहता न आल्याने बुडाले आहेत.
या घटनेची गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता ते मिळून आले नाहीत. त्यांची कपडे नदीच्या कडेला होती. त्यानंतर पोलीस, तलाठी यांना सदरची माहिती कळविल्या नंतर त्या ठिकाणी येऊन शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून गावकरी, पोलीस यांच्यासह पोहता येणारे इसम, माढा येथील बोटीच्या सहाय्याने सीना नदीमध्ये दिवसभर शोध घेतला मात्र ते दोघे मिळून आले नाहीत.
व रात्र झाल्याने शोध कार्य थांबविले. सोमवार ता. 4 रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेतही शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. बुधवार ता. 5 रोजी सकाळी सात वाजता नदीपात्रात शंकर व सत्यम बुडाले होते, त्या ठिकाणापासून जवळच नदीपत्रात असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरी जवळ शंकर बिरणवार याचा मृतदेह पाण्यात तरगंत असताना दिसला. त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्यांनी सत्यमचा शोध घेऊन पाण्यात पडलेल्या ठिकाणा पासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर सत्यम याचा मृतदेह मिळून आला.
त्यानंतर दोघांनाही मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषीत केले. या घटनेची मोहोळ पोलिसात नोंद झाली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार समाधान पाटील, धनाजी घोरपडे हे करीत आहेत.


