सोलापूर: शहर गुन्हे शाखेने चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून एका कारसह सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तर चोरीच्या विद्युतपंप खरेदीप्रकरणी एकास पकडले आहे. त्यांच्याकडून एकूण पाच लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
निशांत बापू बनसोडे, विशाल आनंद ढेरे, अक्षय अमोल कदम (सर्व रा. सोलापूर) या दुचाकी चोरट्यांसह कार चोरीप्रकरणी अभिजित दिलीप चव्हाण (वय ३०, रा. मेन रोड चव्हाण ज्वेलर्स बाजारपेठ, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे) व विद्युतपंप प्रकरणी जमीर अब्दुल रहेमान पैरमपैली (वय ३९, रा. कुर्बान हुसेन नगर, सोलापूर) यांना अटक केली आहे.
४ ते १८ जानेवारीत गस्ती पथकाला मिळालेल्या माहितीनुसार तिघांना पकडून केलेल्या तपासात त्यांनी सहा दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. २४ जानेवारी रोजी अभिजित यास धुळे येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून विनाक्रमांकाची कार जप्त केली. तर जमीर याने एका अनोळखी व्यक्तीकडून दोन विद्युतपंप खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी फौजदार चावडी, विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड, अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, बाळू काळे यांनी ही कामगिरी बजावली.


