मिरज: शहरातील कृष्णा घाट रस्त्यावर एकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अनिल बाळासाहेब पाटील (वय ४३, रा. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कृष्णा घाट रस्त्यावर असणाऱ्या बस थांब्यासमोर ही घटना घडली.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अनिल पाटील हे वड्डी (ता. मिरज) येथे म्हैसाळ रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर कामास होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी ते दुचाकीवरून कृष्णा घाट रस्त्यावरील बस थांब्याजवळ आले व दुचाकी बाजूला उभी करून सोबत आणलेल्या पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थ त्यांनी अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले.
दाह वाढल्याने पाटील यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आर्थिक ताणतणावातून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास सुरू करणार असल्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.


