माहूर: शहरातील श्री देवेश्वर संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या पौराणिक भोजंती तलावाशेजारी राहणाऱ्या युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१) पहाटे उघडकीस आली.
सदर युवक बुधवार जानेवारीपासून बेपत्ता होता. भोजंती तलावात शनिवारी (ता.१) पहाटे उघडकीस आलेल्या घटनेची माहिती घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिस ठाण्यास कळविल्यानंतर पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला.
माहूर शहरातील भोजंती तलावाच्या शेजारी राहणारा भारत रामकृष्ण राठोड (२५) हा युवक गावातील दुकानात काम करायचा. दरम्यान प्रकृती बरी राहत नसल्याने अनेक दिवसांपासून तो घरीच राहत होता.
त्याला आई-वडील,तीन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. तलावाशेजारी राहत असल्याने भारत राठोडने बुधवारीच तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय आहे.भारत याच्या बहिणीच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला.


