👁 4 Views

सोलापूर: क्राईम पेट्रोल पाहून चोरी करणारे तिघे जेरबंद , गुगल मॅपचाही वापर; जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चोरी

सोलापूर: क्राईम पेट्रोल पाहून चोरी करणारे तिघे जेरबंद , गुगल मॅपचाही वापर; जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चोरी

सोलापूर: डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी राजस्थानातील तिघांनी मिळून हैदराबादेत चोरी केली, पण तेथे पोलिसांनी पकडले. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी क्राईम पेट्रोलसारख्या मालिका पाहून पोलिसांना सापडायचेच नाही, असे नियोजन केले.

जुनी चारचाकी विकत घेऊन दोन लोखंडी पारा, बॅटऱ्या खरेदी केल्या आणि गुगल मॅपवरुन मोठ्या बाजारपेठांचा शोध घेत त्यांनी चंद्रपूर, लातूर, सांगलीत चोरी केली. सोलापुरातील बाजार समितीत दोन ठिकाणी त्यांनी चोरी केली आणि एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. त्या तिघांना शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले असून पोलिसांनी कारसह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चंद्रपूर, लातूर येथे चोरी करून आल्यावर त्या तिघांनी सोलापुरात प्रवेश केला. त्यानंतर १७ जानेवारीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील एक व बाजार समितीतील एक, अशा दोन दुकानांमध्ये चोरी झाल्याचे गुन्हे दाखल झाले. त्यांनी बाजार समितीतील एक दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न केला होता.

२२ जानेवारीला गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना खबऱ्याकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली. नंबरप्लेट नसलेली कार कर्णिक नगराजवळील रोडवर थांबल्याची खबर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून माणकचंद बुधारामजी कुमावत (वय ३५), भुंडाराम ऊर्फ बाबू करणारामजी कुमावत (वय ३८) आणि गणपत बगदारामजी कुमावत (वय ४१) हे तिघेही राजस्थानातील बिरोल (ता. जैतारण) येथील आहेत. सध्या ते तेलंगणातील पट्टणचूर तालुक्यात राहायला आहेत. दरम्यान, १७ जानेवारीला त्यांचा चोरीचा डाव फसल्यावर त्यांनी सांगली येथे जाऊन चोरी केली आणि त्यानंतर पुन्हा सोलापुरात आले. त्याचवेळी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जेरबंद केले.

गुगल मॅपद्वारे कोणत्या शहरात मोठे मार्केट आहे, याचा ते शोध घ्यायचे आणि त्या जवळपास लॉजमध्ये राहायचे. दिवसा ते कोणत्या दुकानात चोरी करायची यासंदर्भात रेकी करायचे आणि मध्यरात्री लोखंडी पार नेऊन शटर उचकटून चोरी करायचे. ड्रायफ्रुटस व सिगारेट दुकाने ते चोरीसाठी निवडायचे. चोरीच्या दिवशी ते लॉजमधून वेगवेगळे बाहेर पडायचे आणि एकमेकांच्या मोबाईलवर ते लोकेशन पाठवायचे, अशा बाबी तपासात समोर आल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *