👁 6 Views

जिजाऊ संकटातूनच कणखर बनल्या : प्रा. शिंदे

पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
जिजाऊ संकटातूनच कणखर बनल्या : प्रा. शिंदे
पंढरपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रमाता जिजाबाई यांनी लहान वयातच अनेक संकटे पाहिली, दु:ख भोगले. मात्र याच कठीण वाटचालीतून त्या आत्मनिर्भर व धैर्यवान बनल्या. जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवाजी महाराजांसारखे महान योद्धा, जाणता राजा या राष्ट्राला लाभला, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक एस. पी. शिंदे यांनी केले.
ते जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपाच्या वतीने आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ या विषयावर व्याक्यान देताना हॉटेल विठ्ठल ईन येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अत्यंत लहान वयात जिजाऊंचा विवाह शहाजीराजांशी झाला. शहाजीराजे निजामाचे सरदार असल्याने लहान वयातच सारखी भ्रमंती करावी लागली. भोसले व जाधव यांच्यात वैर आल्याने, नातेवाईक असूनही जिजाऊ शहाजीराजेंच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. शहाजीराजेंनी ईमाने-ईतबारे निजामशाही जपली पण जिजाऊंवर पुन्हा दुसरे संकट आले. दौलताबाद येथील किल्ल्यावर लखोजी जाधव बेसावध असताना त्यांचा व त्यांच्या तीन मुलांना ठार केले. यानंतर यवनांचा नाश करण्यासाठी एका थोर छत्रपतींची गरज असल्याचे जिजाऊंना वाटू लागले.
यवनांचे अन्याय, अत्याचार वाढत होते. महमदखान या मुस्लीम सरदाराने एका मराठा सरदाराची स्त्री पळवून आणली व त्याला दोन लक्ष रूपयांची खंडणी मागितली. या घटनेचा जिजाऊंवर खोल परिणाम झाला. यामुळे स्वराज्याला भक्कम आधार देण्यासाठी त्यांनी शिवरायांना घडविले. रामायण, महाभारतातील पराक्रमाच्या कथा सांगून शिवरायांत शौर्य जागविले. थोर व पराक्रमी योद्धा बनविले. बाल शिवरायांना मांडीवर बसवून दरबारात न्यायनिवाडा त्यांनी केला. शिवरायांवर उत्तम संस्कार केले. 
पुण्याची निर्मिती करण्याचे खरे श्रेय जिजाऊंकडे जाते. पुण्यात आदिलशाहीने धुमाकूळ घातला होता. तेव्हा उद्ध्वस्त पुणे पुन्हा वसविण्याचे काम जिजाऊंनी केले. शेतकर्‍यांना पुन्हा बोलावून बी-बियाणे दिले, त्यांना पुनर्वसाची संधी दिली. सईबाईंच्या निधनानंतर लहान संभाजीराजेंचा सांभाळ व त्यांना घडविण्याचे कामही राजमाता जिजाऊ यांनी केले.
शहाजीराजेसुद्धा अनेक लढायात जिजाऊंचा सल्ला घेत असत. समुद्र मार्गाने हल्ला होऊ शकतो हे जाणून त्या काळात आरमार मजबूत करण्याचे दृष्टेपण जिजाऊंमध्ये होते. शिवाजी महाराजही जिजाऊंचा आशिर्वाद घेऊनच अनेक लढाया जिंकले. शिवरायांच्या अनेक कार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शहाजीराजेंच्या निधनानंतर त्या सती जाणार होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांचे सांत्वन केल्याने त्या परावृत्त झाल्या. त्यांना शिवाजी महाराजांना ‘राजा’ झाल्याचे पहायचे होते.
विवेकानंद हे कृतीशील समाजसुधारक होते : लादे
पंढरपूर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद हे युवकांचे स्फूर्तीस्थान होते. त्यांना तरूणांच्या अंगी असणार्‍या शौर्याची जाणीव होती आणि म्हणूनच या देशाचे भविष्य तरूणच घडवू शकतील, यावर त्यांचा विश्वास होता. स्वामी विवेकानंद हे कृतीशील समाजसुधारक होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन लादे यांनी व्यक्त केले.
ते पंढरपूर येथील हॉटेल विठ्ठल ईन येथे शहर भाजपच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात बोलत होते.
लादे पुढे म्हणाले की, स्वामींनी देश, धर्म, संस्कार, संस्कृती व परंपरा सातासमुद्रापार नेल्या. भारतीयांचे स्वत्व जागृत करण्याचे, त्यांच्या पराजित मानसिकतेवर सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले. आमचा इतिहास पराजयाचा नसून पौरूषाचा आहे. हे त्यांनी जगाला ठणकावून सांगितले.
या काळात देशातील तरूणांची मने मुर्दाड झाली होती. तरूण पराभूत मानसिकतेत जगत होते. देशाचा कणा असलेल्या युवकांत स्वत्व जागृत करण्याचे काम स्वामींनी केले. जाती-धर्मामुळे विलग झालेल्या समाजाला समान तत्वाचे महत्त्व पटवून देऊन एकत्र आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. हिंदूंचे संघटन बांधण्याचे काम पारतंत्र्यात त्यांनी केले. ते नुसते बोलणारे नव्हते, तर कर्ते समाजसुधारक होते. समाज सुधारणेसाठी त्यांनी रामकृष्ण मठ उभा केला. त्याद्वारे अनेक उत्तम सुधारणा केल्या. त्याचा प्रभाव आजही शंभर वर्षानंतर सुद्धा जाणवतो.
पारतंत्र्यात असताना भारताचा भावी काळ कसा असेल याबद्दल ते बोलायचे. जगातील सर्व धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. भारतभर सर्वत्र पदभ्रमण करून समाजजागृती करण्याचे कार्य त्यांनी केले. माझ्या देशाची अवनती का झाली? याची कारणे ते शोधत होते. असे करतानाही भारताच्या भावी काळाबद्दल ते प्रचंड आशावादी होते. भारताची बलस्थाने काय आहेत याची उत्तम जाण त्यांना होती. तसेच अवनती का झाली, याची कारणेही त्यांना ठाऊक होती. युवकांच्या पराभूत मानसिकतेत बदल करण्यासाठी त्यांनी अध्यात्मिकदृष्ट्या कार्य केले. त्यांचे प्रबळ विचार स्वातंत्र्यासैनिकांना प्रेरणा देत असत.
भारताच्या उत्तम भावी काळासाठी त्यांच्याकडे योजना होत्या. गावोगावी व्याख्यानातून त्यांनी युवकांमधील स्फुल्लिंग चेतविले. सर्वात जास्त विश्वास त्यांचा युवकांवर होता. तरूणच खर्‍या अर्थाने सुशासन आणू शकतात, याची खात्री त्यांना होती. स्वामीजींची वाक्ये हृदयापर्यंत भिडायची व मोहिनी घालत असे. केवळ शंभर निधड्या छातीचे तरूण दिले तर नवा भारत घडवेन, असे ते म्हणायचे. त्यांचा हा विचार आजच्या राजकारण्यांनी घ्यायला हवा. विवेकानंद दृष्टे महापुरूष होते. भारताचा भावी काळ ते बघायचे, धर्मात अनेक गोष्टी आहेत, पण सगळ्यात एक समान तत्व आहे. या समान तत्वाने भारतीय मने एक होऊ शकतात, याबद्दल ते ठाम होते. हिंदू धर्मातील भेद व्यवस्थेने व्यक्तींना निर्माण केले. मग अशांना दूर ठेवा. 
गैरसमज, कलुषित भावना दूर ठेवली पाहिजे. अंतर्गत कलह दूर केले तर आपण पुन्हा उभे राहू शकतो. रक्त शुद्ध व शक्तीशाली असेल तर समाजमन निरोगी राहू शकते. त्यांचे शेकडो वर्षापूर्वीचे विचार आजच्या समाजालाही तितकेच लागू होतात. अध्यात्म, संस्काराचे शुद्ध रक्त खेळते रहायला हवे, असे विवेकानंदांचे मन होते, असे लादे यांनी सांगितले.
विविध पत्रकार संघटनांच्या नुतन अध्यक्षांचा सत्कार
पंढरपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्याख्यान व शहरातील सर्व पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सायंकाळी हॉटेल विठ्ठल ईन येथे झाला.
यावेळी व्यासपीठावर पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर, जिल्हा महिला उपाध्यक्षा शकुंतला नडगिरे, रा. स्व. संघाचे सचिन लादे, प्रा. समाधान शिंदे, प्रा. विकास कदम, नागेश अधटराव, शिवदास भिंगे गुरूजी, पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष विनायक हरिदास, प्रविण नागणे, मोहन डावरे, राजकुमार शहापूरकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष विनायक हरिदास, पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण नागणे, शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन डावरे, पंढरपूर साप्ताहिक संघाचे अध्यक्ष राजकुमार शहापूरकर यांचा शाल, फेटा, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार बजरंग नागणे, यशवंत कुंभार, रामभाऊ सरवदे, बाहुबली जैन, कुमार कोरे, रवी लव्हेकर, संजय कोकरे, अपराजित सर्वगोड, सागर आतकरे, अतुल बडवे, शाम दिवेकर, अविनाश साळुंखे, मंदार लोहोकरे, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, शेखर जोशी, प्रशांत आराध्ये, महेश भंडारकवठेकर, सचिन कांबळे, अभिराज उबाळे, सचिन झाडे, शिवकुमार भावलेकर, दत्तात्रय खटवटे, भगवान वानखेडे या पत्रकारांचा सत्कार केला.
भाजपा आदिवासी विकास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल नागेश अधटराव यांचा सत्कार भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी केला.
सत्कारानंतर विनायक हरिदास व प्रविण नागणे यांनी मनोगत व्यक्त केले. हरिदास म्हणाले की, राजकीय विश्लेषणाशिवाय पत्रकारिता पूर्ण होत नाही. राजकारणी व पत्रकार यांचे नाते तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असते. पत्रकार प्रविण नागणे म्हणाले की, वाईकर भाजपाचे शहराध्यक्ष झाल्यापासून येथील पत्रकारांना अच्छे दिन आले आहेत. यामुळे पत्रकारांना बोलायची संधी मिळत आहे. त्यांनी वरचेवर प्रगती करावी. वृत्तपत्रातून शहराच्या समस्या मांडाव्यात, विविध उपक्रम साजरे करावेत.
यावेळी भाजपाच्या शहर उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी, डॉ. प्राजक्ता बेणारे, महिला आघाडी प्रमुख अपर्णा तारके, राजाभाऊ जगदाळे, संजय पालकर, भाजपाचे सरचिटणीस कैलास कारंडे, व्यापारी सेलचे नितीन करंडे, डॉ. शशिकांत धायतडक, भीमाशंकर घोडके, शाम तापडिया, आनंद नगरकर, आनंद कुलकर्णी, नंदकुमार कवठेकर, पूजा बोरामणीकर, संदीप कुलकर्णी, भाजयुमोचे शहराध्यक्ष विदुल अधटराव, युवती अध्यक्षा देवयानी दामोदरे, आदित्य जोशी, सुप्रिया वाईकर, हर्षदा नगरकर, रवींद्र साळी, भारत गदगे, मंजूषा गदगे, छबु उत्पात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाईकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व निर्भीडचे संपादक शेखर जोशी यांनी केले. आभार सुरेंद्र कवठेकर यांनी मानले. डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास कारंडे, विदुल अधटराव, नितीन करंडे, संजय खराडे, संजय पालकर, अनिल शिंदे, दादा धोत्रे, राम चौगुले, लखन ननवरे, छबु उत्पात, सुरेंद्र कवठेकर, श्याम तापडिया, उमेश ढोबळे, आनंद नगरकर, संदीप कुलकर्णी, संजय मस्के, लखन माळी, प्रशांत धुमाळ, सतीश सासवडकर, किरण खडाखडे, सागर खरात, रवी देवमारे, अजय दहिवडे आदी भाजप पदाधिकारी तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ : (1) राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पंढरपूर भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान समारंभात पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनायक हरिदास यांचा सत्कार मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते करण्यात आला. शेजारी श्याम तापडिया. दुसर्‍या छायाचित्रात शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन डावरे यांचा सत्कार करताना भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमाशंकर घोडके, तिसर्‍या छायाचित्रात पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण नागणे यांचा सत्कार करताना राजाभाऊ जगदाळे, चौथ्या छायाचित्रात पंढरपूर साप्ताहिक संघाचे अध्यक्ष राजकुमार शहापूरकर यांचा सत्कार करताना व्यापारी सेलचे नितीन करंडे.
(2) राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पंढरपूर भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभानंतर उपस्थित मान्यवरांसमवेत पत्रकारांचे टिपलेले सामुदायिक छायाचित्र.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *