अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व पुतण्या डॉ. सुजय विखे पाटील यांना पाडणे हेच माझे लक्ष्य असून, निवडणूक होईपर्यंत मी नगरमध्ये तळ ठोकणार असे वक्तव्य राधाकृष्ण विखे यांचे थोरले बंधू अशोक विखे यांनी केले आहे. दरम्यान, सख्ख्या चुलत्याने अशी भूमिका घेतल्याने सुजय विखेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
अशोक विखे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. यात ते सुजय विखेंच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत त्यांना एका वाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
अशोक विखे म्हणाले की, माझे वडिल बाळासाहेब यांनी माझ्यासमोर राधाकृष्ण यांना मृत्यूपूर्वी सांगितले होते की जातीयवादी लोकांसोबत कधीही जाऊ नकोस. आपण त्यांच्याशी आयुष्यभर लढलो आहे. त्यांच्यासोबत गेला तर लोकांसमोर कसे जायचे? मात्र आता सुजय विखे भाजपात गेले आहेत. बंधू राधाकृष्ण व वहिनी शालिनीताई या लवकरच भाजपात जाणार आहेत. त्यामुळे मी नगरमध्ये सुजयच्या विरोधात प्रचार करणार आहे.
माझे वडिल बाळासाहेब यांच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी व आजोबांनी उभ्या केलेल्या सर्व वेगवेगळ्या संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माझे आजोबा, वडिलांनी इथल्या लोकांचे भले व्हावे यासाठी या संस्था मोठ्या मेहनतीने उभ्या केल्या आहेत. मात्र, राधाकृष्ण यांनी त्याचा वापर स्वार्थासाठी, सत्तेसाठी व पैशासाठी सुरू केला आहे. विविध संस्थांतील कामगारांचे पगार वेळेवर आता होत नाही, कारखाना तोट्यात गेला आहे. त्याची उलाढाल २५० कोटींनी कमी झाली आहे. याबाबत मी आवाज उठवला. मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्रे लिहली मात्र राधाकृष्ण यांचे सत्ताधारी लोकांशी सेटिंग आहे. मी वेगवेगळी ४०-५० प्रकरणे आहेत. मात्र, भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मुलगा भाजपमध्ये गेल्याने मी दोन वर्षापूर्वी केलेला आरोप खरा होता हे सिद्ध झाला असल्याचे अशोक विखेंनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने ज्या झाकीर नाईक याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे त्याच्या ईस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने प्रवरा एज्यूकेशन संस्थेने २ कोटींचा दिला आहे. ज्या अतिरेक्याने सामान्यांचे रक्त सांडून वाईट मार्गातून पैसा कमविला त्याचा पैसा यांनी स्वीकारला आहे, असा गंभीर आरोपही अशोक विखेंनी केला.
पवार-विखे कुटुंबियांच्या वादाबाबत बोलताना अशोक विखे म्हणाले की, पवार-विखे कुटुंबियांत कोणताही वाद नाही. मात्र, राधाकृष्ण याला चुकीचा रंग देत आहेत. राधाकृष्ण विखे यांनी आठ महिन्यापूर्वीच शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घेतले होते. मात्र, पवारांनी त्याचवेळीच त्यांना ही जागा काँग्रेसला सोडता येणार नाही असे स्पष्ट बजावले होते. नगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे. तेथे पक्षाचे नगरसेवक, आमदार यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसला जागा देऊन माझ्या कार्यकर्त्यांचे मी काय करू असा सवाल पवारांनी राधाकृष्ण यांना केला होता. त्यावेळी सुजय राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यास तयार आहे असे सांगितले. त्यावेळी पवारांनी राधाकृष्ण यांना सांगितले की होते की, तुम्ही एका जबाबदार पक्षाच्या जबाबदार पदावर आहे. तुम्ही असे वागणार असाल तर ते योग्य ठरणार नाही असेही पवारांनी सांगितल्याचे अशोक विखेंनी सांगितले.
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण यांचे सख्खे बंधू अशोक विखे यांनी पुतण्या सुजय विखेंच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. जातीयवादी लोकांच्याविरोधात लढण्यास मला माझे वडिल बाळासाहेब यांनी सांगितले होते. माझा बंधू राधाकृष्ण यांच्याशी कौटुंबिक वाद नाही तर तत्त्वाचा लढा असून, तो आपण शेवटपर्यंत लढू, असे अशोक विखे यांनी सांगितले.


