पंढरपूर : सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी पंढरपूर शहरात निघालेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुमारे अर्धा किलोमीटर इतकी लांब गर्दी या पदयात्रेत सहभागी झाली होती. युवा वर्ग, महिला, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्या सहभागाने सुमारे चार तास ही पदयात्रा चालली.
उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे गाडीमधून सर्वांना अभिवादन करीत होते, तर कॉंग्रेस कमेटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांचा एक जूट गाडीसोबत चाललेला होता. श्री. शिंदे यांच्यासोबत आ. रामहरी रुपनवर उपस्थित होते. पदयात्रेचे नेतृत्व तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विठ्ठल सहकारीचे संचालक भगीरथ भालके, शहराध्यक्ष राजाभाऊ भादुले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कॉंग्रेसच्या सौ. सुनेत्राताई पवार, साधना उगले, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते अशपाकभाई तांबोळी, मामा फलटणकर, नागेश गंगेकर, संजय घोडके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या रॅलीत उत्स्फुर्त सहभाग घेतला. जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, दिनकर पाटील, सचिन कदम, विजय काळे आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सुरुवातीला शिवाजी चौक येथून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा सुरू झाली. त्यानंतर भादुले चौक, नाथ चौक, प्रदक्षिणा मार्गावरून कालिकादेवी चौक, तेथून अण्णाभाऊ साठे चौक, सांगोला रोड, भक्तिमार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशन रोडवरून पुन्हा शिवतीर्थ अशी ही पदयात्रा झाली. त्यामध्ये श्री. शिंदे यांनी कालिका देवी चौकातील मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना केली, तसेच महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या यात्रेमध्ये पंढरपूर शहर आणि मतदारसंघातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रत्येक चौकात नागरिकांनी पुष्पहार घालून शिंदे यांचे स्वागत केले आणि ठिकठिकाणी गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या उधळून या रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीच्या पुढे ढोल-ताशा तसेच लोककलावंत, वासुदेव, टाळकरी अशांनी देखील आपल्या कला सादर केल्या. पंढरपूर शहरातून भव्य पदयात्रा या निवडणुकीतील पहिलीच यात्रा ठरली. महिला बचत गट, कॉंग्रेस पदाधिकारी, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना, मातंग समाज या सर्वच समाज संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच बाबा अधटराव, नगरसेवक लखन चौगुले, मनसेचे दिलीप धोत्रे, समीर भोसले, मारुती भोसले, धनंजय कोताळकर या लोकांनी रॅलीमध्ये शिंदे यांची भेट घेऊन सदिच्छा दिल्या. तसेच नाना वाघमारे, लक्ष्मीनारायण भट्टड, आदी लोकांनीही शिंदे यांचे स्वागत केले. सुमारे चार तास ही पदयात्रा झाल्यानंतर दुपारी चार ते सहापर्यंत सुशीलकुमार शिंदे यांनी टिळक स्मारक मंदिर येथे विविध संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी देखील शिंदे यांना भेटण्यासाठी गवळी समाज, मातंग समाज, जैन समाज, धनगर समाज, तसेच दलित समाजातील अनेक संघटना आल्या होत्या. या सर्वांशी शिंदे यांनी हितगूज केले.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!