सोलापूर, दि. ५ –
सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेवरुन सुरु झालेला वादातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह ३१ जणांवर सदर बझार पोलीस चौकीत पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रशासनाने मनाई केली असतानाही मंदिर समितीतर्फे सोमवारी (४ जानेवारी) आपत्कालीन रस्त्यावर दुकाने थाटून त्याचे उद्घाटन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे प्रणिती शिंदेंसह महापौर सुशीला आबोटे, मंदिर समिती अध्यक्ष धर्मराज काढादी यांच्यासह ३१ जणांवर जमावबंदी आदेशासह विनापरवाना स्पीकर वापरणे, उपोषणाला बसणे या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. आमदार नरसय्या आडम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांविरोधात मोर्चा काढला आहे. आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या आहेत. मागील काही दिवसापासून सोलापूरमध्ये सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेवरुन वाद सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आराखड्याला देवस्थान समितीचा विरोध केला आहे. तर आपत्कालीन रस्ता परंपरेप्रमाणे देवस्थानाला खुला करावा या मागणीसाठी देवस्थान समितीच्या वतीने तीन दिवसांपासून चक्री उपोषण सुरु आहे. भविष्यात हे वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.