गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील शेतकर्‍यांच्या मुलांकडून फी च्या नांवाखाली लाखो रूपये गोळा केले- आमदार भारत भालके

Loading

 

सरकोली, ता.पंढरपूर ः येथे श्री विठ्ठल सहकारी साखर  कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत बोलतांना आमदार श्री भारतनाना भालके. याप्रसंगी सर्वश्री कल्याणराव काळे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, रावसाहेब चव्हाण, भगिरथ भालके, युवराज पाटील, मारूती भोसले, नारायण मोरे, नितीन बागल, माऊली हळणवर आदी.

पंढरपूर (दि.12) ः राज्यात व केंद्रात शेतकरी हिताच्या विरोधात सरकार आल्याने सोलापूर जिल्ह्यातीरल शेतकर्‍यांचे सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याच सरकार मधील काही मंडळींनी राजकीय हेतूने श्री विठ्ठल कारखान्याची निवडणुक सभासदांवर लादली आहे. राज्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारे हे लोक श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांच्या हिताचे काय दिवे लावणार असा टोला आमदार श्री भारतनाना भालके यांनी विरोधी गटाचे पॅनल प्रमुख श्री बी.पी.रोंगे यांना लगावला.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरकोली,ता.पंढरपूर येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे हे होते.
यावेळी बोलतांना आमदार श्री भालके म्हणाले की, खासगी शैक्षणिक संस्था काढून या लोकांनी तालुक्यात शिक्षणाचा बाजार मांडला आहे. यातूनच त्यांनी गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील शेतकर्‍यांच्या मुलांकडून फी च्या नांवाखाली लाखो रूपये गोळा करून कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी लाखो रूपयांची लूट केली आहे.
विरोधी पॅनलमधील बहुतांश उमेदवारांचा कारखान्याशी काही संबंध नाही. पॅनल प्रमुखांनी गेल्या 15 वर्षात एकदाही ऊस कारखान्याला दिला नाही. एकदा दिला तोही सरकारचा कर वाचविण्यासाठी. अशा संधी साधू व गैरविश्‍वासू लोकांपासून सावध राहण्याची वेळ आली आहे. याच मंडळींच्या विचाराचे राज्यात व केंद्रात सरकार आल्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हक्काच्या उजनीच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले. डोळ्यात देखत हातातोंडाशी आलेले पिक जळून गेली. यामध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा सवाल करीत चुकीच्या माणसांना खड्यासारखे बाजूला काढावे असे आवाहनही आमदार श्री भालके यांनी केले.
यावेळी संचालक युवराज पाटील म्हणाले की, कै.औदुंबरआण्णा पाटील यांच्या विचारांना मान देणारे गांव आहे. सुरूवातीपासून आण्णांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेवून जात असलेले आमदार श्री भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. सभासदांनी पुन्हा कारखान्याच्या विकासासाठी आमदार श्री भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला विजयी करावे. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे, माजी व्हा.चेअरमन श्री मारूती भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री नितीन बागल, जिल्हा अध्यक्ष श्री माऊली हळणवर तसेच सर्वश्री शहाजी नागणे, भगिरथ भालके यांची भाषणे झाली. यावेळी सरकोली येथील अपक्ष उमेदवार श्री श्रीनिवास यांनी श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलला आपला जाहीर पाठींबा दिला.
सभेस सर्वश्री रावसाहेब चव्हाण, नारायण मोरे, शहाजी नागणे, धनंजय पाटील, विठ्ठल मोरे, व्यंकटराव भालके, रणजित पाटील, पांडुरंग भोसले, नितीन नागणे, तुकाराम माने, रायाप्पा हळणवर आदींसह शेतकरी सभासद व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *