मजुराच्या मुलाला आयपीएल 9 ने कोट्यधीश बनवलं

मुंबई : आयपीएल 9 च्या लिलावामध्ये अनेक तरुण खेळाडू महागड्या बोलीमुळे चर्चेत राहिले. पण यातच आणखी एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे नाथू सिंह. एका मजुराचा मुलगा असलेला नाथू सिंह आता कोट्यधीश झालेल्या निवडक खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. महिना 7 हजार रुपये कमावणाऱ्या मजुराचा मुलगा आता आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपये कमावणार आहे.
राजस्थानचा जलदगती गोलंदाज असलेला नाथू सिंहला आयपीएल 9 च्या लिलावात तब्बल 3.2 कोटींची बंपर बोली लागली आहे. नीता अंबानींच्या मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केलं. 10 लाख रुपयांची बेस प्राईस असलेल्या या क्रिकेटरला खरेदी करण्यासाठी पुणे सुपरजायंट्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे दोन्ही संघ प्रयत्न करत होते.
नाथू सिंह जयपूरमध्ये एका छोट्या घरात राहतो. तआयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांतून वडील आणि लहान भावाला आरामात राहता येईल, असं मोठं घर खरेदी करण्याची नाथूची इच्छा आहे.
नाथू सिंह हा राहुल द्रविडने शोधलेला खेळाडू असल्याचं म्हटलं जातं. या जलदगती गोलंदाजाला मुंबई इंडियन्सने 3 कोटी 20 लाख देऊन खरेदी केलं.
20 वर्षीय नाथू सिंहच्या वडिलांना आयपीएल 9 लिलावाबाबत काही कल्पनाही नव्हती. ते त्यांच्या कामात व्यस्त होते.
राजस्थान संघाच्या नाथू सिंहचा वेग ताशी 145 किमीच्या जवळपास आहे. त्याने चेन्नईतील एमआरएफ पेस अकादमीमध्ये ग्लेन मॅग्राने त्याला प्रशिक्षण दिलं होतं.
मागील वर्षी दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात पदार्पण करताना त्याने 87 धावांत 7 विकेट्स घेतल्याने तो चर्चेत आला होता. यानंतर कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेविरोधातील सराव सामन्यात बोर्ड प्रेसिडेंट XI मध्ये त्याचा समावेश होता. नाथू सिंह टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.

मजुराचा मुलगा बनला स्टार क्रिकेटर


– नाथूचे वडील भरत सिंह वायर फॅक्टरीमध्ये मजुरी करतात. त्यांचा पगार सात हजार रुपये आहे.
– भरत सिंह पूर्वी शेती करत होते, परंतु खर्च वाढू लागल्याने ते फॅक्टरीमध्ये नोकरी करु लागले. पत्र्याने बनलेल्या दोन खोल्यांच्या घरात ते राहतात.
– गल्ली क्रिकेट खेळताना कोणी तरी म्हणालं की, नाथू फास्ट बॉलिंग करतो, त्याला क्रिकेट शिकवा
– पण क्रिकेटची फारशी समज नसतानाही भरत सिंह यांनी मुलाचं कौशल्य पाहून त्याला प्रोत्साहन दिलं
– नाथूला क्लब पाठवण्यास सुरुवात केली. फी म्हणून वार्षिक दहा हजार रुपये भरण्यास तयार झाले. दोन महिन्यांची फी भरली आणि म्हणाले, दोन महिने खेळ त्यानंतर पाहू पुढे शिकायचं की नाही
– भरत सिंह कधी स्वत: सायकलवरुन मुलाला क्लास घेऊन जात तर कधी बसने कोचिंगसाठी पाठवत
– दोन महिन्यात नाथू अकादमीचा स्टार खेळाडू बनला. त्याच्या कुटुंबीयांची परिस्थिती पाहून अकादमीनेच त्याची फी भरली
– नाथू चांगलं खेळू लागला आणि याच वर्षी त्याची अंडर-19 संघात निवड झाली.


स्वत:ला आदर्श मानतो

सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ हा नाथूचे आवडते खेळाडू आहेत. पण तो स्वत:लाच आदर्श मानतो. कारण संघर्ष करुन आज या ठिकाणी पोहोचल्याचं तो सांगतो.
वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली आहे. वडिलांनी रात्रदिवस एक करुन पैसे जमवले, त्यामुळेच मी आज क्रिकेटर होऊ शकलो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *