पुण्यात प्रियकराच्या साथीने आईकडून पोटच्या मुलाचा खून

पुणे : अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या आईनेच केल्याची घटना पुण्यात रविवारी उघड झाली. प्रियकराच्या साथीने तिने हे कृत्य केलं. महत्त्वाचं म्हणजे मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह राहत्या घरीच पुरला. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस तसंच दिल्ली पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाची आई वरिता उर्फ ऋती (वय 40 वर्ष) आणि तिचा प्रियकर युनुस रहमत अली (वय 33 वर्ष) अशी या आरोपींची नावं आहेत. दिल्लीत आजोबांसोबत राहणाऱ्या निकोलसचं (वय 13 वर्ष) या दोघांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर मुलाचे आजोबा जोसेफ जॉल यांनी 2 सप्टेंबर 2015 रोजी दिल्लीच्या नेबसराई पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र निकोलसला पुण्यात घेऊन आल्याचं मुलगी ऋतीने सांगितलं आणि नातवाचं आजोबांशी बोलणं करुन दिलं. निकोलस सुखरुप असल्याचं कळल्यानंतर आजोबा निश्चिंत होते.
यानंतर निकोलससोबत ख्रिसमसाठी दिल्लीत येत असल्याचं ऋतीने सांगितलं. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी युनुस अलीने आजोबांना कॉल करुन, निकूने आत्महत्या केली असून त्याच मृतदेह राहत्या घरीच पुरल्याचं सांगितलं. या कॉलमुळे आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांन दिल्ली पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.
दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे मोबाईल बंद होते. काही महिन्यांपूर्वी एका मोबाईलवरुन निकोलस आणि त्याच्या आजोबांचं बोलणं झालं होतं. त्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन तो मोबाईल नंबर युनुस अलीच्या मित्राचा असल्याचं समजलं. त्याच्या मित्राकडून अधिक माहिती घेतली असता अली फुरसुंगीतील बेंदवाडी इथे राहत असल्याचं कळलं. या माहितीवरुन दिल्ली पोलिस आणि हडपसर पोलिसांनी तपास करत अलीच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
आरोपी ऋती आणि अली काही महिन्यांपूर्वी बेंदवाडी इथे राहण्यास आले होते. मात्र 19 डिसेंबरपासून ते फरार होते. शिवाय घराचा दरवाजा बंद असल्याने मुलाचा खून झाल्याचा संशय बळावला.
अखेर रविवारी सकाळी हडपसर पोलिस, दिल्ली पोलिस, नायब तहसीलदार, पंच साक्षीदार, कमांड हॉस्पिटलच्या डॉक्टर पथकासह घरातील दिवाणाखालची फरशी काढली. त्याखाली खोल खड्ड्यात निष्पाप निकोलसचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. अत्यंत सराईतपणे सहा फूट लांबीचा आणि तीन फूट रुंदीच्या खोल खड्ड्यात मुलाचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यावर मोठे दगड आणि माती टाकून पुन्हा फरशी त्याच जागेवर बसवून त्यावर सोफा ठेवून आरोपींनी पळ काढला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *