नवी दिल्ली : सियाचीनमध्ये मृत्यूला चकवा देणारी वीरजवान हनुमंतप्पा कोप्पड यांची प्रकृती गंभीर आहे. हनुमंतप्पा यांच्यावर दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रुग्णालयाने हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीसंदर्भातील अहवाल लष्कर प्रमुखांकडे सोपवला आहे.
पुढील 24 तास हनुमंतप्पांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हनुमंतप्पा यांच्या पत्नी आणि आईसह कुटुंबातील सहा जण दिल्लीत दाखल झाले आहेत.
हनुमंतप्पा जिवंत सापडले
तीन फेब्रुवारीला झालेल्या हिमस्खलात 800×400 फूट बर्फाळ भिंत कोसळली आणि यामध्ये भारताचे 10 जवान गाडले गेले. मात्र 6 दिवसानंतर 9 फेब्रुवारीला एक जवान जिवंत सापडला, तो म्हणजे हनुमंतप्पा होय. शोध मोहीमेदरम्यान लान्स नाईक हनुमंतप्पा 6000 मीटर उंचीवर, आठ मीटर म्हणजेच सुमारे 25 फूट आत बर्फामध्ये जिवंत सापडले.
हनुमंतप्पा यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मेडिकल बुलेटीननुसार, लान्स नायक हनुमंतप्पा सध्या व्हेंटिलेटरवर त्यांची प्रकृती नाजूक आहे. शरीरातील रक्तस्राव थांबला आहे. रक्तस्राव पूर्ववत होण्यासाठी आणखी 24 ते 48 तास लागतील.
जवानाला न्यूमोनिया झाला आहे. यकृत आणि किडनीमध्ये संक्रमण झालं आहे. त्यामुळे बर्फाच्या आत असल्याने कोणताही अवयव निकामी झालेला नाही. तसंच हाडांनाही नुकसान झालेलं नाही.
न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, एन्ड्रोक्रायनोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट आणि सर्जन हनुमंताप्पांवर उपचार करत आहे. रक्तदाब सामान्य स्तरावर आणण्यासाठी अनेक औषधांचा उपयोग केला जात आहे.
भारतमातेच्या सुपुत्रासाठी डबेवाल्यांचं देवाला साकडं
सियाचीनमध्ये संकटांशी झुंज देणाऱ्यां हनुमंतप्पा यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं म्हणून मुंबईकरांनी सिद्धीविनायकाला साकडं घातलं आहे. तर मुंबईच्या डबेवाल्यांनीही वारकरी परंपरेने पसायदान म्हणत ईश्वराकडे हनुमंतप्पांना लवकर बर वाटू दे अशी प्रार्थना केली आहे.
सर्वात उंच लढाऊ मैदान
सियाचीन हे जगातील सर्वात उंच असं लढाऊ मैदान आहे. इथे रात्रीचं तापण उणे 50 अंशापर्यंत खाली जातं. अशा तापमानात भारताचे जवान सीमेच्या रक्षणासाठी सज्ज असतात.
काश्मीरला लागून असलेल्या काराकोरम क्षेत्राच्या पूर्वेकडच्या सगळ्यात मोठ्या पाच ग्लेशियर्सपैकी एक म्हणजे सियाचीन. समुद्रसपाटीपासून 16 ते 20 हजार फूट उंचावर असलेलं सियाचीन भारत आणि पाकिस्तानसाठी मात्र युद्धभूमी आहे. तेही गेल्या 28 वर्षांपासून.2003 पासून इथं युद्धबंदी लागू आहे. मात्र तरीही दोन्ही देशांचे सैनिक इथं नेहमीच सज्ज असतात.
सियाचीनवर भारताची पकड
सियाचीनवरील भारताची पकड खूपच मजबूत आहे…सियाचिन ग्लेशियरसोबतच इथल्या उत्तरेकडील सलतोरो पर्तरांगांवरही भारताचा ताबा आहs. पाकिस्तानी सैन्य भारतापेक्षा खूपच खाली आहे…सियाचीनचं संरक्षण करण्यासाठी भारताची तीन हजार सैनिकांची एक ब्रिगेड सदैव इथं तैनात असते. त्यांना पुरेशी रसद आणि सामान पोहचवण्यासाठी वायुदलाचे चेतक, चिता, एमआय – 8 आणि एमआय -17 हे हेलिकॉप्टर सतत या परिसरात घिरट्या घालत असतात.

