अपुऱ्या सिंचन योजना पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न – जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे

पंढरपूर दि. 11:-  
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, शेतीसाठी आवश्यक पाणी पुरवठा व्हावा यासाठी अपुऱ्या सिंचन योजना पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
अकलूज येथे सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री शिवतारे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड, आ. महादेवराव जानकर, आ. नारायण पाटील, माजी मंत्री उत्तम खंदारे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक व राजाभाऊ राऊत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीस पाणी देण्यासाठी अपुऱ्या असलेल्या व कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या योजनांचा बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे. ज्या अपुऱ्या योजना कमी कालावधीत पूर्ण होतील यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असून त्या जोमाने पूर्ण करण्याचे नियोजन शासनामार्फत सुरु आहे. राज्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या असून या योजनांमुळे टंचाई परिस्थितीवर सहज मात करणे शक्य होणार आहे.
राज्यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कामासाठी अर्थ संकल्पामध्ये तरतूद करुन ही कामे मार्गी लावली जातील. माळशिरस तालुक्यातील कोल्हापूर पध्दतीच्या 9 बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जाईल. बंधारे दुरुस्तीकेल्याने पाण्याची गळती  रोखण्यास मदत होणार आहे, असे राज्यमंत्री शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात सुमारे      24 टीएमसी विकेंद्रीत पाणी साठा निर्माण झाला आहे. या पाणी साठ्यामुळे त्या-त्या भागात टंचाईची तीव्रता कमी जाणवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 15 हजार कि.मी.चे नदी खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानामध्ये कंपन्या व सामाजिक संस्थाही सहभागी होत असून त्यांच्यामार्फत  750 किमी लांबीची नदी खोली करणाची कामे झाली आहेत. सोलापूर जिल्हाने जलयुक्तमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे.
यावेळी उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड आणि आमदार महादेवराव जानकर यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यात निर्माण झालेली टंचाईची परिस्थिती दूर करणे, पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा छावण्या उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार सुधारकपंत परिचारक यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती, अपूर्ण असलेल्या सिंचन योजनाची माहिती दिली. तसेच माळशिरस तालुक्याचा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये समावेश व्हावा अशी मागणीही केली. समारंभास मान्यवर पदाधिकारी आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *