मुंबई : अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत उद्या भारताला वेस्ट इंडीजचा सामना करायचा आहे. बांगलादेशात मिरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता या लढाईला
सुरुवात होईल. पाहूयात या लढतीवर आमची स्पोर्ट्स प्रतिनिधी जान्हवी मुळेचा रिपोर्ट.
ईशान किशनची यंग टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकापासून केवळ एकच पाऊल दूर आहे. एकही सामना न गमावता भारतानं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या या विजयी वाटचालीत मुंबईच्या दोन युवा फलंदाजांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. ते म्हणजे सरफराझ खान आणि अरमान जाफर.
मुंबईच्या मुशीत घडलेला सरफराझ या स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरलाय. सरफराझनं यंदा अंडर-19 विश्वचषकाच्या पाच सामन्यांमध्ये 76 च्या सरासरीनं 304 धावा केल्या आहेत. त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सरफराझनं संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी वेळोवेळी समर्थपणे पेलली आहे.
दुसरीकडे सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या अरमान जाफरनं मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलंय आणि संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली आहे. जाफरनं या स्पर्धेत पाच सामन्यांमध्ये 38.75 च्या सरासरीनं 155 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या अंडर-19 टीममध्ये अरमान जाफर द्रविडचीच भूमिका निभावतो आहे.
सलामीवीर ऋषभ पंत, मधल्या फळीतला फलंदाज वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खानही भारताच्या अंडर-19 संघाचे आधारस्तंभ आहेत.
ऋषभनं पाच सामन्यांत 266 तर वॉशिंग्टननं पाच सामन्यांत 109 धावा केल्यायत. तर आवेश खाननं पाच सामन्यांत भारताकडून सर्वाधिक अकरा विकेट्स काढल्या आहेत.
सरफराझ, अरमान, ऋषभ, वॉशिंग्टन आणि आवेश या पाच शिलेदारांकडून भारताला आता फायनलमध्येही अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
भारतानं अंडर-19 विश्वचषकाची फायनल गाठण्याची ही पाचवी वेळ असून, याआधी तीनदा म्हणजे 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वाखाली, 2008 साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली आणि मग 2012 साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली भारतानं अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. त्या पंक्तीत आता ईशान किशन स्थान मिळवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

