भुवैकुंठ पंढरी नगरीत माघी यात्रेनिमित्त जया एकादशीच्या दिवशी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापुजा केली. यावेळी त्यांचेसोबत पुजेला उपस्थित राहण्याचा सन्मान सांगली जिल्ह्यातील श्री व सौ. तानाजी दादू कवाळे या दांम्पत्याला मिळाला.
भागवत धर्मामध्ये माघी यात्रेला अत्यंत महत्व आहे. पंढरीत भरणार्या प्रमुख वार्यांमध्ये आषाढी व कार्तिकी पाठोपाठ या माघी वारीला अनेक भाविक येत असतात. या वारीला अनेक भाविक ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाही ते या एकादशी च्या दिवशी आपल्या गळ्यात पंढरीत येऊन विठ्ठलाच्या साक्षीने तुळशीची माळ धारण करुन वारकरी सांप्रदायाची दीक्षा घेतात. आजच्या दिवशी माळ घालणारे वारकरी व ज्यांचे हातुन ही माळ घातली जाते असे त्यांचे अध्यात्मीक ह.भ.प. महाराज (गुरु) यांचेसाठी या वारीचे महत्व अनन्यसाधारण असे असते
.
चंद्रभागेत पवित्र स्नान करुन विठुनामाच्या जयघोषात सावळ्या पांडुरंगाचे दर्शन आज लाखो भाविकांनी घेतले. विठ्ठलाचे साजिरे रुप याची देही याची डोळा पाहुन मनात भरुन ठेवले. विठोबाच्या पायावर मस्तक ठेवुन संसारात येणार्या अनेक अडचणींना सामोरे जाण्यासाठीचे एक अभुतपुर्व बळ अंगी घेऊन धन्य झाल्याचे समाधान वारकर्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. या वारीमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
श्रीविठ्ठलाची नित्यपुजा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्नीक केली तर रुक्मिणी मातेची पुजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सपत्नीक केली. यावेळी मानाचे वारकरी दांपत्य तसेच प्रांताधिकारी संजय तेली, तहसिलदार नागेश पाटील, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे, समितीचे व्यवस्थापक विलास महाजन आदी उपस्थित होते. आजच्या वारीसाठी लाखोंच्या संख्येने आलेले भाविक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने पंढरीत दाखल झाले होते. अनेक जण प्रदक्षिणा रांगेत उभे राहुन विठ्ठलाचे दर्शन घेत होते तर कांहीजण मुखदर्शन घेत होते. ज्यांनी आषाढी, कार्तिकीवेळी दर्शन घेतले असे वारकरी नामदेव पायरीचे दर्शन घेत होते. कळसाचे दर्शन घेत होते. शहरातील विविध मठांमध्ये व चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर जागेमध्ये दिंड्या व फडकरी विसावलेले होते. टाळ-मृंदंगाच्या निनादात, विठुनामाच्या जयघोषात अवघी पंढरी दुमदुमुन गेली होती. ॥ विनवणी। संतजनी परिसावे। विसर तो न पडावा। माझा देवा तुम्हाशी॥ हे संतवचन प्रत्येकाने आपल्या मनावर कोरलेले होते.



