पंढरपूर (प्रतिनिधी)- ‘‘केवळ मानव जातीमध्येच नव्हे तर पशु-पक्षी आणि प्राणी यामध्येही कोणीही आई –
वडिलांच्या ऋणातून मुक्त होवू शकत नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आई-वडिलांचे अनमोल व अतुलनीय असे योगदान असते.
अनेक प्रश्न, बिकट परिस्थिती प्रसंगी हालअपेष्टा सोसून प्रत्येकाचे आई-वडिल बालकांचे संगोपन करतात आणि बालकांस समाजामध्ये ताठ मानेने जीवन जगण्यासाठी परिपक्व करण्याचा प्रयत्न करतात,’’ असे प्रतिपादन येथील ख्यातनाम कवी रविराज सोनार यांनी केले.
ते भोसे (करकंब) येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत
होते. ‘‘मायचं मातृत्व बा चं पितृत्व’’ या त्यांच्या कवितेच्या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी त्यांच्या स्वत:च्या व महाराष्ट्रातील इतर ख्यातनाम कवींच्या आई व वडिल या विषयावरच्या लोकप्रिय असणार्या कवितांचे वाचन व गायन केले. काव्यवाचन व गायनाबरोबरच रविराज सोनार यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील आई-वडिलांचे महत्व आणि आई-वडिलांसाठी मुला-मुलींची कर्तव्ये याविषयी उहापोह केला. त्यांच्या आई-वडिलाविषयीच्या कविता ऐकताना यशवंत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग भावूक झाला होता.
यशवंत विद्यालयातील गुरूकुल प्रकल्पांतर्गत कार्यक्रमाच्या या उपक्रमप्रसंगी येथील कवी राजेंद्र झुंबर भोसले यांनीही काव्यवाचन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या काव्य सादरीकरणाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बी.आर.माने, उपप्राचार्य रोंगे, पर्यवेक्षक एम.डी.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरूकुल विभाग प्रमुख व्ही.जी.शिंदे, योगेश कंगळे, मुकुंद भोसले या व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.बी.पावले यांनी केले तर आभार के.डी.शिंदे यांनी मानले.


