![]()
पंढरपूर (प्रतिनिधी):-
छत्रपती शिवाजी महाराज केवळ जयजयकारापुरते, उत्सवापुरते किंवा कुठल्या तरी प्रतीकापुरते नाहीत. त्यांचे नांव घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण न करता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे खरं कार्य आहे, जे लोककल्याणकारी, निधर्मी समाजाचं, बंधुभावाचं, संपुर्ण विश्वाला एकत्रीत गुंफण्याचं असं कार्य होतं. ते आम्ही सर्वत्र पोहचविण्याचं कार्य आम्ही हाती घेतलं. यासाठी सर्वांनी गावोगावी शिवजयंतीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं खरं कार्य पोहोच करावं यासाठी मराठा सेवा संघानं कार्यक्रम हाती घेतले. शिवजयंतीसह विविध महामानवांच्या जयंती निमीत्त कार्यक्रम घेणेचे कार्य हाती घेतले. छत्रपती शिवाजी महाराज हे जगभरात पोहोचले पाहिजेत हे आमचे व आपल्या सर्वांचे उद्दीष्ट होते. त्यातला बहुतांश भाग साध्य झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी आपल्या राज्यात, देशात व परदेशातही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे. असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्क्त केले.
एका कार्यक्रमा निमित्त पंढरपूरमध्ये ते आले असताना येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेमध्ये ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा सेवा संघाला 25 वर्षे पुर्ण झाली आहेत. आजपर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. गेल्या 25 वर्षात मराठा सेवा संघ आणि विविध 33 कक्ष निर्माण केले. शैक्षणीक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, मिडीया या पाच प्रमुख सत्ता आम्ही मानलेल्या आहेत. या क्षेत्रातील उपक्षेत्रात जे जे काही सकारात्मक कार्य झालेले आहेत हे आपणास माहित आहे. कांहीवेळा वादविवाद ही झाले. दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजा महाराजांची जयंती आपण साजरी केली. पूर्वी शितवजयंतीचा सार्वजनिक उत्सव व्हायचा मात्र शिवजयंती साजरी करताना तारखेचा अथवा तिथीचा वाद होता मराठा सेवा संघाने शासकीय आणि सामाजिक पातळीवर याबाबत संपर्क साधला आणि 1994 पासुन 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवरायांची जन्म तारीख लक्षात घेऊन किल्ले शिवनेरी पासुन शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात झाली. शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरीवर पूर्वी पण मुख्यमंत्री जायचे शिवजयंती साजरी करुन गडाखाली पायथ्याला कार्यक्रम घ्यायचे. मात्र आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावरच मोठ्या प्रमाणात साजरी करावी, लोकांशी संवाद साधावा त्यानुसार हा उत्सव या ठिकाणी मोठ्या भव्य प्रमाणात साजरा होताना दिसतो आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक विशिष्ट हिंदु धर्माचे प्रतिक किंवा त्यांचं प्रतिनिधीत्व ते करत होते अशा प्रकारे आपल्या देशात समज पसरविला जात होता. याविषयी कांही आक्षेप नव्हता मात्र शिवाजी महाराज हे इतर धर्मियांचा द्वेष करत असत, इतर धर्मियांच्या विरोधात होते. अशा प्रकारचं चित्र रंगविलं जात असे परिणामी इतर समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दंगलीसारखे प्रकार घडत होते. ज्या मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती नव्हती किंवा जी माहिती होती ती चुकीची होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यबद्दल चुकीचा संदेश जात असे. मुस्लिम समाज ला वस्तुस्थिती चे माहिती देऊन मराठा सेवा संघाने खरा इतिहास समोर आणण्याचे कार्य करण्यात यश मिळविले आहे. मतभेद दुर झाले आहेत.
शिक्षण क्षेत्रात नविन पिढीने स्वत:ला उच्च शिक्षणासाठी तयार करुन घेतले पाहिजे, जगातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना असावी, एमपीएससी, युपीएससी मध्ये गेल्या 20 वर्षाचा मराठी टक्का पाहिला तर सात-आठ-दहा हुन अधिक नव्हता मात्र आज तो आकडा शंभरावर गेला आहेे. प्रत्येक-तरुण मुलामुलींना जगातील प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान असणं आवश्यक आहे. काहीना काही विषयामध्ये ते तरबेज असलेच पाहिजेत अशी भुमिका मराठा सेवा संघाची होती. यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. बदलत्या शेतीची अवस्था पहाता शेतीवरचा बोझा वाढला आहे. नोकर्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मुला-मुलींना दिशा नाही. मराठा समाजातील देशमुख-पाटील-कुणबी अशा कांही उच्चभ्रु मराठा समजणार्या तरुण मुलामुलींमध्ये कांही करायचे तर मोठेच करीन नाहीतर उपाशी मरु. असा जो अहंगंणड होता तो काही अंशी कमी करण्याचे कार्य गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही केले आहे. पैसा असेल तर मोठा उद्योग करा, इंडस्ट्री उभारा; मात्र तुमच्याकडे पैसा नसेल पण कला, कौशल्य असेल तर जो जमेल तो व्यवसाय करा, कोणत्याही प्रकारचा अहंगंड मनात बाळगु नका, सर्व्हिस सेक्टरमध्ये खुप वाव आहे. ते करा अशा प्रकारे मराठा समाजातील मुला-मुलींना मार्गदर्शन करुन त्यांच्यातील टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी अअमचा प्रयत्न होता अअणि चालु आहे. नविन पिढीने वाचन कमी केले असे बोलले जाते मात्र ही तरुण पिढी सोशल मिडीया च्या माध्यमातून व्यक्त होत आहे. ही तरुण पिढी जागृत आहे, चांगली आहे. त्यांना योग्य वळण लावण्यामध्ये आमचा वाटा आम्ही उचललेला आहे. बरीचशी तरुण मुलं साहित्य क्षेत्रात आपले नांव कमावत आहेत. पर्यटन क्षेत्रातही आपली तरुण पिढी नांव गाजवत आहे. विविध क्षेत्रात विविध देशात आज मराठा समाजातील तरुण मुलं मुली कार्यरत होताना आढळत आहेत. ही बाब गौरवास्पद आहे. ऐतिहासिक व धार्मिक पुस्तकांमधील वादविवाद मिटण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन होणे आवश्यक आहे.
शेतकरी स्वत:ला इज्जतदार समजतो. पूर्वी शेतकर्यांचे एकत्रीत कुटूंब असे शेतातील विविध कामात कुटूंबातील इतर सदस्य मदत करत असत. मात्र आत्ता ती परिस्थिती राहिली नाही. पूर्वी बाजारात शेतकर्यांना किंमत होती मात्र आत्ता ती राहिलेली नाही. यामुळखे शेतकरी दुखावला जात आहे. दुष्काळामुळे नाही तर आपल्या इभ्रतीच्या चिंतेनं शेतकरी दु:खी आहे. 72-73 चा मोठा दुष्काळ येऊन गेला. त्यानंतर हरिक्रांती झाली. शेतकरी पुन्हा उभा राहिला. तसा अजुनही राहिल. यासाठी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून आम्ही शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवित आहोत. दुष्काळामुळे अनेक भागातून शेतकरी आणि त्यांची मुलं शहराकडे वळत आहेत. मोठ मोठ्या शहरात आलेल्यांना आधार देण्यासाठीचे सर्व प्रयत्न करत आहोत. शेतकर्यांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याची आवश्यकता आहे. शेतकर्यांच्या बळावरच देश उभा आहे. शेतकर्यांना सवलती देणं आणि सबसिडी तसंच शेतीमालाला भाववाढ देऊन शेतकर्याला उभं करणं हे देशाचं कर्तव्य आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पूर्वी इबीसी सारख्या सवलती होत्या. आत्ता ओबीसी मध्ये आरक्षण हवे आहे. ही काळाची गरज आहे. अलीकडच्या 20 वर्षाच्या काळात ही मागणी होतीय. आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर येण्याची गरज नाही. याबाबतची सर्व तयारी झालेली आहे. फक्त कांही कागदपत्रांची पुर्तता करणं बाकी आहे. सरकारसोबत चर्चा करुन सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन आरक्षण प्रश्नाबाबत लढा दिला आहे, चालु आहे, लवकरच हा प्रश्न सुटेल अशी आशा आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हायलाच हवे. यासोबतच गड किल्ल्यांचे संवर्धन ही होणे अत्यावश्यक आहे. स्मारकासाठी येणारा 2000 कोटीच्या खर्चाची पुर्तता करणं सरकारला शक्य नसेल तर त्यांनी यासाठी महाराष्ट्रात मेळावे घेऊन निधी गोळा करावा. स्मारकं हे पुढील पिढीला प्रेरणा देणारी असतात. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होणं उचीत आणि स्वागतार्ह असेच आहे.
अशा विविध विषयांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर भरभरुन बोलले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती खराडे, जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने, संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, शिवविचारवंत अमरजित पाटील, विजय प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दिपक वाडदेकर, सौदागर मोळक, दत्ता भोसले, प्रशांत पाटील, तात्या देवकर, अरुण फाळके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

