देहू – राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूमध्ये सध्या 120 कोटींची विकासकामे होत आहेत. दोन बाह्यवळण रस्ते, अंतर्गत रस्ते, इंद्रायणी नदीवर दोन पूल, इंद्रायणी घाटाचे सुशोभीकरण, भक्तनिवास तसेच स्वच्छतागृहे यांचा यात समावेश आहे. त्यामुळे देहूची राज्यातील स्वच्छ आणि सुंदर तीर्थक्षेत्र तसेच आदर्श पर्यटनस्थळाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. देहूसाठी 244 कोटींची तरतूद आहे. संत तुकाराम महाराज जन्म चतुःशताब्दी वर्ष सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने देहूमध्ये नोव्हेंबर 2011 मध्ये विकासकामास सुरवात केली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि विविध खात्यांतील अधिकाऱ्यांसमवेत समिती स्थापन केली. सर्व सहमतीने विकासकामे सुरू झाली. प्रथमतः देहूतील अंतर्गत रस्त्यांची कामे केली. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमिनी दिल्या. आतापर्यंत भूसंपादनासाठी सरकारने 45 कोटी रुपये दिलेत. गावाबाहेरून दोन रिंग रोड बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे रस्ते चाकण-तळेगाव आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारे आहेत. त्यांच्यासाठी 27 कोटी रुपये खर्च आला आहे. पालखीमार्गासाठी 13 कोटी रुपये खर्चून अंतर्गत रस्ते केले आहेत. इंद्रायणीवरील दोन पुलांसाठी 13 कोटी रुपये खर्च असून, त्यापैकी एका पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 120 मीटर लांब, 12 मीटर रुंद असलेला पूल सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे तळेगावकडील वाहतूक सुरळीत होईल.
22 किलोमीटरच्या जलवाहिन्या
ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी पाण्याची 22 किलोमीटर वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो निधी मंजूर आहे. आठ कोटी खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देहू, विठ्ठलवाडी, माळवाडी, वडाचे माळ परिसरात या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. ही 21 कोटींची योजना आहे. मलनिस्सारण, सांडपाणी शुद्धीकरण योजना राबविण्यात येणार आहे. त्याचे 40 टक्के काम झालेले आहे.
राज्यातून येणारे लाखो भाविक इंद्रायणी नदीवर स्नानासाठी जातात. घाट सुशोभीकरणासाठी 18 कोटींचे काम झाले आहे. मुख्य देऊळवाडा ते वैकुंठस्थान, गाथामंदिरापर्यंतचे काम झालेले आहे. वैकुंठस्थान येथे भक्तनिवास होत आहे. त्यासाठी साडेआठ कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या ऑगस्टमध्ये ते पूर्ण होईल. ग्रामस्थांना रोजगारासाठी पूजासाहित्य दुकाने बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर आहे.
विकास आराखड्यांतर्गत एकूण 34 कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी 29 कामे सुरू आहेत. भूसंपादनासाठी सरकारने 45 कोटी रुपये वेगळे दिलेले आहेत. 118 कोटींची कामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी 47 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत.

