जड पावलांनी घेतला विठुरायाचा निरोप !

पंढरपूर (भगवान वानखेडे) ः –  आज बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर जाणार्‍या गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून जात होत्या. दिंडीबरोबर आलेल्या वारकर्‍यांपैकी बर्‍याच भाविकांनी आज परतीच्या प्रवासासाठी एसटी, रेल्वेला गर्दी केली होती. त्यामुळे पुणे रस्त्यावरील चंद्रभागा बसस्थानक, 65 एकरवरील भीमा बसस्थानक आणि गुरसाळे येथील विठ्ठल बसस्थानकावर जाणार्‍या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

’कन्या सासुराशी जाये। मागे परतुनी पाहे।्।
तैसे झाली माझिया जीवा। पुन्हा केव्हा भेटशी केशवा।्।’

सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांची अवस्था या अभंगातील ओवीतील माहेरवाशिण मुलीसारखी व्याकूळ झाली आणि गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली विठ्ठल भेटीसाठीची पायपीट आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली.

आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरीत आलेल्या  अगणित पालख्या आणि लाखो  वारकरी पंढरीत जमल्यामुळे  पंढरपूर शहर वारकर्‍यांसाठी अपूर्ण पडत असल्याचे चित्र दिसत होते. रस्त्यांच्या दुतर्ङ्गा, बसस्थानक आणि मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी मुक्काम ठोकलेला होता. चंद्रभागेत स्नान करून कुणी पददर्शन बारीत, कुणी मुख दर्शनबारीत तर कुणी कळसाचे दर्शन घेऊन पुन्हा ’आजी दिवस धन्य, झाले तुमचे दर्शन’ या ओवीप्रमाणेच त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. मुखदर्शनासाठी तासागणिक किलोमीटरच्या पटीत रांग वाढत गेली. तशीच रांग नामदेव पायरीच्या दर्शनासाठी व लाडू प्रसाद विक्री केंद्राच्या बाहेर मिनिटागणिक मीटर-मीटरने रांग वाढत गेली होती. त्यामुळे मंदिराच्या सर्व बाजूने रांगाच रांगा दिसत होत्या.

आषाढी यात्रेची सांगता असणारा गोपाळकाल्याचा सोहळा आज गोपाळपूरमध्ये संपन्न झाल्यानंतर मात्र पंढरीतील वारकर्‍यांची गर्दी ओसरु लागलेली आढळली. सावळ्या विठोबावर संसारादीक सर्व सुख-दु:खाचा भार सोपवून ॥ कोठे धावे मन। तुझे चरण देखलीया॥ या संतवचनानुसार संसाराची सर्व मोह-माया-बंधने झुगारुन पंढरीत विठुरायाच्या चरणी लीन झालेल्या  वारकर्‍यांनी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी जड अंत:करणाने विठ्ठल रखुमाईचा निरोप घेतला व ॥ माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥ म्हणत पुढील वर्षी पुन्हा तुझ्या भेटीला येतो असे अभिवचन आपल्या आराध्ये पांडुरंगाला देऊन पंढरी सोडली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *