पंढरपूर/प्रतिनिधी
स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ व रघुकूल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र अशा संपूर्ण श्रावण मासात ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब बडवे यांच्या श्रवणीय श्रीमद् भागवत कथासाराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण मास हा आध्यात्मिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. याचेच औचित्य साधून कोर्टी रोड येथील रघुकूल सोसायटीच्या श्री राम मंदिरात श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून ते श्रावण वद्य अमावस्येपर्यंत म्हणजेच दि. 3 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत सदरच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 3 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजता श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते आणि भागवत कथेचे विवेचनकर्ते श्री. बाळासाहेब बडवे यांचे गुरुवर्य वेदांत शिरोमणी श्री. बाळासाहेब हरिदास यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पंढरपूर शहरातील एक ज्येष्ठ आणि व्यासंगी पत्रकार म्हणुन श्री. बडवे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याच ओघवती शैलीतील वक्तृत्त्वाच्या वाणीने आता श्रीमद् भागवत कथासारही पंढरपूरकरांना ऐकावयास मिळणार आहे. सदरचा श्रीमद् भागवत कथासार कार्यक्रम हा बुधवार 3 ऑगस्टपासून प्रतिदिन सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये कोर्टी रोड येथील श्री राम मंदिरात संपन्न होणार आहे. तरी या भागवत कथासाराचा नागरिकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भागवत प्रेमी मंडळ पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Posted inPandharpur
