जिल्हयातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा- जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या सूचना

  
सोलापूर दि. 4 : – सोलापूर जिल्हयातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, अशा सूचना जिल्हाधिकारी  रणजीतकुमार  यांनी आज येथे दिल्या.
                           राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात करावयाच्या उपाययोजना आणि घ्यावयाची दक्षता याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  रणजीतकुमार यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
                            जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सांगितले की, जिल्हयातील सर्व नदी, नाले यावर  असणारे जुने पूल यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडीट करावे. जे पूल धोकादायक  स्थितीत आहेत, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल द्यावा. मोठया पूलाबरोबरच  लहान पूल, बंधारे याबाबतही काळजी घेतली जावी.
                            पुण्यात होणा-या  पावसामुळे जिल्हयातील भीमा आणि नीरा खो-यातील नदी काठच्या गावात पुराचे पाणी येवू शकते. त्यामुळे जलसंपदा विभागाने पुण्यातील धरणातून केला जाणारा विसर्ग त्यामुळे येणारे पाणी याबाबतची माहिती जिल्हा प्रशासन आणि सर्व संबंधित विभागांना द्यावी. यामध्ये महावितरण, सार्वजनिक बांधकाम, तहसिलदार,  महसूल प्रशासन यांना कळवावी. येणारे  पाणी   किती वाजता कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकते याची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या.
                          सार्वजनिक बांधकाम विभागाचे भीमा नदीवरील पंढरपूर मधील जुना पूलाची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असेही जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाशी सर्व विभागाने संपर्कांत रहावे. महावितरण, जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आदी विभागांनी एकत्रितपणे कार्य करावे, असेही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सांगितले.
                         यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी, शहाजी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास मोरे, एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एन.व्ही.जोशी, महावितरणचे धनंजय औंढेकर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *