पंढरपूर तालुक्यातील मेंढापूरच्या तरुणाचा डेंग्युुमुळे मृत्यु गटविकास अधिकार्‍याच्या हलगर्जीपणाविरुध्द उग्र आंदोलन छेडू!- नितीन नागणे

पंढरपूर (भगवान वानखेडे):- पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील एका 22 वर्षीय तरुणाचा डेंग्युमुळे आज दुर्दैवी मृत्यु झाला आहे. ग्रामीण भागातील डेंग्युसारख्या साथीच्या आजारासंदर्भात उपाययोजना न करणार्‍या पंढरपूर पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकारी (बीडीओ) ज्ञानेश्‍वर घुगे यांच्यासह जबाबदारी झटकणार्‍या अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणाविरुध्द आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती दैनिक दामाजी एक्सप्रेसशी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली आहे.

याबाबत नितीन नागणे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मेंढापूर येथील तरुण हिंमत पाटील (वय 22) यास ताप आल्याने आठ दिवसापूर्वी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर त्याला लगेच सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. येथे या तरुणास डेंग्युच झाल्याचे निदान झाले. या तरुणाच्या किडण्या त्यामुळे फेल झाल्या होत्या. परंतु सिव्हील हॉस्पिटलमध्ये डायलेसीस ची सुविधा नसल्यामुळे त्यास सोलापूर मधील अश्‍विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी तीन दिवसापूर्वी दाखल केले होते. मात्र त्याचा आज दि. 10 नोव्हेंबर रोजी करुण अंत झाला.

या तरुणास डेंग्युसदृश्य तापाची लागण झाल्यानंतर आम्ही तात्काळ पंढरपूर पंचायत समितीमध्ये धाव घेतली. येथील गटविकास अधिकारी (बीडीओ) ज्ञानेश्‍वर घुगे यांना मेंढापूर या गावातील तरुणाला डेंग्यसदृश्य तापाची लागण झाली असून या गावात तत्परतेने ग्रामपंचायतीमार्फत फवारणी वगैरे उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली. परंतु त्यांनी हो बघु, करु अशी उडवा-उडवीची उत्तरे दिली. अद्याप या गावात कसलीही फवारणी वा कोणतीच उपाययोजना केली गेली नाही. आज हिंमत च्या दुर्दैवी मृत्युनंतर आत्ता तरी या गावात फवाणी वगैरे कामे करावयाचे आदेश द्या..! अशी मागणी पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले यांना यांच्याकडे केली. तेंव्हा त्यांनी तर कळसच केला. ते म्हणाले की, आम्ही फक्त सर्व्हे करतो, बाकीच्या गोष्टी आमच्याकडे नसतात..! एका तरुणाच्या मृत्युनंतर देखील पंचायत समितीचे जबाबदार अधिकारी अशी बेपर्वाईची उत्तरे देत असतील तर हा प्रकार खरंच खुप संतापजनक असाच होता. मेंढापूर या गावात आणखी डेंग्यसदृश्य साथीच्या आजाराची लागण कुणाला होऊ नये यासाठी पंचायत समितीच्या प्रशासनाने त्वरीत पावले उचलणे अपेक्षीत असताना येथील अधिकार्‍यांचे हे कामचुकारपणाचे वागणे कशाचे द्योतक आहे?
अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची जाण करुन देण्यासाठी व त्यांची डोकी ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही येत्या दोन ते तीन दिवसात संबंधीत अधिकार्‍यांच्या विरुध्द उग्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिला आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *