पंढरपूर (भगवान वानखेडे):- येत्या 11 नोव्हेंबर रोजी पंढरीत कार्तिकी यात्रेचा सोहळा भरणा असून यासाठी कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने विठ्ठलभक्त पंढरीत दाखल होत असतात. पंढरीत सध्या या यात्रेच्या निमित्ताने येणाया भाविकांची संख्या वाढत असून पंढरी नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. भाविकांची श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन दि. 1 नोव्हेंबरपासून श्रीविठ्ठल रुक्मिणीस लोड देऊन विधीवत पुजा करण्यात आली. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने देवाचा पलंगही काढला असल्याची माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
दि. 1 नोव्हेंबर रोजी श्रीविठ्ठल रुक्मिणीची विधीवत पुजा करताना मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन व कर्मचारी उपस्थित होते.
दर्शनरांगेतील भाविकांच्या असुविधा व पोलिस यंत्रणेवरील तणाव टळावा!
मागील अनेक यात्राकालावधीत व नुकत्याच झालेल्या विजयादशमी च्या सणाच्या वेळी श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शनरांगेत उभारलेल्या भाविकांचे मंदिर समितीच्या घिसाड नियोजनामुळे मोठे हाल झाले होते. कांही चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले होते. परिणामस्वरुप शहर पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढलेला होता. पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अगोदरच शहर पोलिसांना बंदोबस्ताचा ताण असताना मंदिर समितीच्या अधिकार्यांनी कार्तिकी वारीदरम्यान तरी दर्शन बारीत भाविकांना मोकळा श्वास घेता येईल असे नियोजन करावे अन्यथा भाविकांचे हाल तर होतीलच परंतु पोलिस प्रशासनालाही तणावाला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी शहर पोलिस अधिकार्यांनी मंदिर समितीच्या अधिकार्यांसोबत एक बैठक घेऊन याबाबत सजग रहाणे आवश्यक आहे.

