![]()
वाहतुक,सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करू पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर: श्री सिध्देश्वर महायात्रेबाबत बैठक
सोलापूर दि. 10: - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महायात्रेच्या कालावधीत वाहतूक, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोर नियोजन केले जाईल. नियोजन करताना सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार केला जाईल,असे पोलीस आयुक्त् रवींद्र सेनगावकर यांनी आज येथे सांगितले.
श्री सिध्देश्वर महायात्रेच्या नियोजनासाठी आज पोलीस आयुक्त् कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त सेनगावकर बोलत होते. बैठकीस महापौर सुशीला आबुटे, श्री सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त् विजय काळम-पाटील, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर म्हणाले, ‘श्री सिध्देश्वर महायात्रेला महाराष्ट्र तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून भाविक येतात. भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करुन वाहतुक, सुरक्षा व्यवस्था आणि इतर आवश्यक बाबींचे काटेकोर नियोजन केले जाईल.’
सोलापूर महापालिकेने होम मैदानाची स्वच्छता करावी. आवश्यकता असल्यास सपाटीकरण करावे, असे त्यांनी सांगितले. यात्रा काळात भाविकांना विविध धार्मिक कार्यक्रम पाहता यावे यासाठी एलईडी स्क्रीन लावावेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थान मंदीर, होम मैदानाच्या परिसरात सीसीटीव्ही लावावेत, अशी सूचना त्यांनी केली. होम मैदान परिसरातील वीजेचे खांब, वीज वाहक तारा सुव्यवस्थित कराव्यात. यासाठी महावितरणला सूचना करावी, असे त्यांनी सांगितले. यात्राकाळात केली जाणारी रोषणाई आणि भाविक यांच्यात पुरेसे अंतर असावे. उभारले जाणा-या दोन स्टॉल्मध्ये अंतर ठेवावे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्टॉलचा नकाशा तयार करुन घ्यावा, असे सेनगावकर यांनी सांगितले.
महापौर सुशिला आबुटे यांनी यात्रेसाठी महापालिकेकडून सर्व सहकार्य केले जाईल. ध्वज मार्गाची पाहणी करण्याची तारीख लवकरच निश्चित करावी, असे सांगितले. त्याचबरोबर अक्षता समारंभादिवशी महिलांसाठी फिरत्या प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी यात्रेच्या संयोजनासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य राहील. होम मैदान नजिक असणारा रस्ता वापरण्यास द्यावा. रस्ता खराब झाल्यास पुर्ववत करुन देऊ, असे सांगितले.
सोलापूर महापालिकेचे आयुक्त विजय काळम-पाटील यांनी होम मैदान देवस्थान समितीकडे वेळेत सुपूर्द करु. त्यापूर्वी पूर्ण स्वच्छता आवश्यक असेल तेथे सपाटीकरण करु असे सांगितले. यावर्षीही महापालिकेकडून आरोग्य केद्र, अग्निशमन सेवा यात्रा काळात पूर्णवेळ उपलब्ध करुन देऊ, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी यात्रा सुनियोजित आणि व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय महत्वाचा आहे. यासाठी येत्या 15 डिसेंबर 2016 रोजी यात्रेशी निगडीत सर्व संबंधितांची पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, असे सांगितले.
यावेळी उप विभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार हणमंत कोळेकर, देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त सर्वश्री ॲङ. आर.एस.पाटील, चिदानंद वनारोटे, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, सिध्देश्वर बमणे आदी उपस्थित होते.
