कवी संमेलन आणि पुस्तके भेट देऊन मराठी भाषा दिन साजरा

पंढरपूर/प्रतिनिधी
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून येथील शब्दांकूर साहित्य वर्तुळाचे अध्यक्ष रवी सोनार, कवी राजेंद्र भोसले, गणेश गायकवाड यांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात काव्य वाचनाचा कार्यक्रम करून दै. पंढरी संचारचे अनिरुद्ध बडवे आणि संपादक शिवाजी शिंदे यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील ग्रंथालयासाठी पुणे येथील चपराक प्रकाशनाची विविध विषयांवरील वाचनीय पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिरुद्ध बडवे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पुस्तक भेटसारखा उपक्रम मराठी भाषा दिनी होणे हा कव रवी सोनार यांचा स्तुत्य उपक्रम आहे. आज वाचनाची आवड कमी होत असताना अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे वाचनाची आणि मराठी साहित्य वृद्धींगत होणार्‍या चळवळीला या निमित्ताने चालना मिळेल. अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवाजी शिंदे म्हणाले की, सामाजिक जाणिवेतून असे उपक्रम होणे गरजेचे आहे. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांना एक प्रकारचा विरंगुळा प्राप्त होईल. कार्यक्रमाचे आयोजक रवी सोनार म्हणाले की, साहित्यिकांना लेखनातून व वाचनातून आनंद मिळत असतो. हा आनंद वृद्धाश्रमातील मराठी रसीक-वाचकांना व्हावा म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी कवी राजेंद्र भोसले आणि कवी गणेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रवी सोनार यांनी ‘मराठीचे गुणगान’ आणि राजेंद्र भोसले यांनी ‘माय मराठी’ या कविता सादर केल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने वृद्धाश्रमातील नागरिकांना साहित्याची मेजवानीच मिळाली. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
रवी सोनार यांनी याआधीही मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकुसारख्या कार्यक्रमाला वाण म्हणून तसेच अंधशाळेतील मुलांना ब्रेल लिपीतील पुस्तके त्याचप्रमाणे वाढदिवस, लग्नसमारंभ आदी समारंभांच्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके भेट स्वरूपात दिली आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे मराठी साहित्य क्षेत्रातून कौतुक होत आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *