महिलांची मतदार यादीत नोंदणीसाठी
विविध उपक्रम राबविण्यात येणार
सोलापूर,दि.6: आंतरराष्ट्रीय महिलादिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने प्रधानसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महिलांना लोकशाही प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सूचित केले आहे. महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महिला मतदारांची संख्या कमी आहे.महिला दिनानिमित्त ही तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
यासाठी महिला वसतीगृह, अंगणवाडी सेविका, आशावर्कर परिचारिका, महिला बचतगट, अशासकीय संस्था इत्यादिंच्या मदतीने महिला मतदारांची नोंदणी वाढविणे, राज्यातील प्रतिष्ठित महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, विवाहीत महिलांची पूर्वीची नोंदणी रद्द करुन नवीन ठिकाणी त्यांची मतदार म्हणून नोंदणी करणे, महिलांची मतदार नोंदणी वाढविणे याप्रकारचे उपक्रम निवडणूकयंत्रणा व बी.एल.ओ.च्या सहकार्याने राबविण्यात येणारआहे. जिल्हयातील सर्व मतदार नोंदणीअधिकारी व सहायक मतदारनोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवार,दिनांक 8 मार्च,2017 रोजी महिला मतदार साक्षरता हा विशेष उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.
या कार्याक्रमामध्ये ज्या महिलांची नव्याने मतदार नोंदणी झाली आहे अशा महिलांना मतदार छायाचित्र ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यासंदर्भात् संबधित मतदारनोंदणीअधिकारी व सहायक मतदारनोंदणी अधिकारी यांनाआवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा,असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केलेआहे.
